Join us

Climate Change; यंदाचे वर्ष ठरणार आणखी विक्रमी उष्ण वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:15 AM

गेल्या वर्षी ग्रीनहाउस गॅस, जमीन तसेच पाण्याचे तापमान तसेच हिमनद्या, समुद्रातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. हे प्रमाण कमी करण्याचे सर्व देशांचे प्रयत्न अपुरे पडले. या गोष्टींमुळे यंदाचे वर्षदेखील आणखी एक विक्रमी उष्ण वर्ष असेल.

गेल्या वर्षी ग्रीनहाउस गॅस, जमीन तसेच पाण्याचे तापमान तसेच हिमनद्या, समुद्रातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. हे प्रमाण कमी करण्याचे सर्व देशांचे प्रयत्न अपुरे पडले. या गोष्टींमुळे यंदाचे वर्ष देखील आणखी एक विक्रमी उष्ण वर्ष असेल, अशी शक्यता जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केली आहे.

ग्लोबल वॉर्मिंगची स्थिती या विषयावर जागतिक हवामान संघटनेने मंगळवारी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये अधिक वाढ होऊ न देणे हे सर्वांच्याच हिताचे आहे.

जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करायला हवेत. तसे न झाल्याचे जगाला त्याचे आणखी दुष्परिणाम भोगावे लागण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेच्या महासचिव सेलेस्टे साउलो यांनी दिला आहे.

मार्च २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जागतिक तापमान १.५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक होते. या कालावधीत सरासरी जागतिक तापमान १.५६ अंश सेल्सियस होते. मात्र यंदाच्या वर्षाची सुरुवातीलाच जागतिक तापमान मागील वर्षापेक्षा अधिक होते.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी सांगितले की, आपल्यासमोर किती मोठे संकट उभे आहे हे जागतिक हवामानाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जीवाश्म इंधनातून होणाऱ्या प्रदूषणातून मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या घडामोडींचा ग्लोबल वॉर्मिंगशीही संबंध आहे.

गेल्या वर्षी बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले■ गेल्या वर्षी हिमनद्यांतील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळले आहे. १९५० सालापासून आजपर्यंतचे हे सर्वात मोठे प्रमाण आहे.■ अंटार्क्टिका समुद्रातील बर्फाचे प्रमाणही खूप कमी झाले.■ या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर यंदाचे वर्ष आणखी एक विक्रमी उष्ण वर्ष असण्याची शक्यता आहे असे जागतिक हवामान संघटनेचे मत आहे.

टॅग्स :तापमानहवामाननदीपाणीप्रदूषण