Climate change : ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर उन्हाळ्याचा भास होईल, असे ऊन चटकते, तापमानाचा पारा वाढलेला असतो असा नागरिकांचा आजवरचा अनुभव आहे.
परंतु यंदा परिस्थिती वेगळीच झाली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस पडत आहे. त्यामुळे ऑक्टोबर कोल्डचा अनुभव बीडकरांना येऊ लागला आहे. तर या उलट परिस्थिती नागपूरकर अनुभवत आहेत . तेथे नुसत्या घामाच्या धारा लागल्या आहेत.बीड : यंदा पावसाची सुरूवात चांगली झाली. शेतकऱ्यांना अपेक्षित असा पाऊस झाला. जून महिन्यात पेरणी योग्य पाऊस, त्यानंतर थोडा गॅप व पुन्हा जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठे पाऊस झाले. शेवटच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात बीड जिल्ह्यात मोठे पाऊस झाले अन १० ते १५ टक्क्यांवर असणारी धरणे १०० टक्के भरुन ओसंडून वाहू लागली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणी परिस्थिती पूर्णतः बदलून गेली.
धरण क्षेत्रात मोठे पाऊस झाल्याने बिंदुसरा धरण भरून वाहू लागले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला बिंदुसरा धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा होता आता पाणी पातळीत वाढ होऊन दुथडी भरुन वाहत आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी अधिक पावसामुळे बीड शहरातील नदीकाठच्या अनधिकृत रहिवाशांना नगरपालिकेतर्फे नोटिसा देण्यात आल्या होत्या. पाणी परिस्थिती ओसरली असताना आता पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला आहे.
शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास बीड शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात हिट यंदा फारशी जाणवली नाही. यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्यापासून सुटका मिळाली आहे.
सोमवारी(२१ ऑक्टोबर) रोजी जोरदार पाऊस बीड शहरात सकाळीच ढग दाटून आले होते. मोबाईलवरसुद्धा पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला होता.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास एका तास हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा दुपारी ३ ते ३:४५ या वेळेत पाऊस झाला. सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे आणखी पाऊस पडतो की काय असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. बीड शहरात झालेल्या पावसामुळे बीड शहरातील अनेक भागांत पाणीच पाणी झाले होते.
अंदाज फोल; पावसाच्या नाही, घामाच्याच धारा
नागपूर : वादळासह जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता, मात्र हा अंदाज सोमवारी(२१ ऑक्टोबर) रोजी फोल ठरला. आकाश निरभ्र होते व पावसाचे कोणतेही चिन्ह दिसून आले नाही.
उलट रविवारी ४.६ अंशांनी घसरलेले तापमान सोमवारी पुन्हा ३.४ अंशांनी वाढून ३२.९ अंशावर गेले. त्यामुळे आकाशातून पावसाच्या नाही पण शरीरातून घामाच्या धारा लागल्या होत्या.
अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने देशातील अनेक भागांत पाऊस असताना विदर्भातही दोन दिवस पावसाळी स्थिती तयार झाली होती.
शनिवार व रविवारी अमरावती, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांत पावसाची जोरदार हजेरी लागली. नागपुरातही पावसाळी वातावरणतयार झाले व हलक्या सरीही बरसल्या. त्यामुळे अनेक दिवसांनंतर रविवारी पारा ४.६ अंशाने घसरत पहिल्यांदा २९ अंशावर खाली आला. त्यामुळे मध्यरात्रीनंतर नागपूरकरांनी हलकी थंडीही अनुभवली.
सोमवारी पुन्हा जोराच्या पावसाचा अंदाज होता. मात्र, सकाळी आकाशातून ढगांची गर्दी हटली आणि सूर्याचे चटके वाढले. पारा वाढला आणि दिवसभर नागपूरकरांना उकाड्याने त्रास दिला.
दिवसा तापमान वाढले असले तरी रात्री मात्र हलक्या थंडीची जाणीव होत आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली, असे म्हटले जात आहे.हवामान विभागाने पुढचे २४ तास विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. मात्र, या चक्रीवादळाचा कुठलाही धोका नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर कुठलाही परिणाम होणार नाही.