Join us

Cloud Burst Rainfall ढगफुटी होते म्हणजे नक्की काय होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 4:07 PM

अशा अतिवृष्टीवेळी क्यूम्यलोनिम्बस प्रकारचे ढग तयार होतात, त्यांची उंची १२ ते १५ किलोमीटर असते. हे ढग एकदम फुटतात आणि जोरदार पाऊस होतो, तो ढगफुटीसारखाच असतो.

श्रीकिशन काळेपुणे : मान्सून येण्यापूर्वी अनेकदा स्थानिक वातावरणातील बदलामुळे ढगफुटीसारखा पाऊस कोसळतो. असाच पाऊस वडगावशेरी, लोहगाव, कात्रज, एनडीए या भागात दोन दिवसांमध्ये झाला आहे.

अशा अतिवृष्टीवेळी क्यूम्यलोनिम्बस प्रकारचे ढग तयार होतात, त्यांची उंची १२ ते १५ किलोमीटर असते. हे ढग एकदम फुटतात आणि जोरदार पाऊस होतो, तो ढगफुटीसारखाच असतो, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ व 'आयएमडी'चे माजी प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी 'लोकमत'ला दिली.

गेल्या दोन दिवसांमध्ये पुण्यातील कात्रज, लोहगाव, वडगावशेरी, एनडीए या भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. दोन-तीन वर्षापासून अशा प्रकारचा पाऊस होत आहे. आता मान्सूनपूर्व पाऊस झाला आणि यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातही असाच पाऊस झाला होता.

मान्सून सुरू होण्यापूर्वी ढगफुटीसारखा पाऊस होत असतो. आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, त्यापूर्वी दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस पुण्यात झाला आहे. हवामान बदल हे एक कारण अशा प्रकारच्या पावसासाठी सांगता येईल.

तसेच दिवसभर तापमान खूप असते, त्याचाही परिणाम होतो. तापमान आणि आर्द्रता अधिक असल्यावर बाष्पीभवन होते आणि मग क्यूम्यूलोनिम्बस ढंग तयार होतात. हाच प्रकार वडगावशेरी, कात्रज परिसरात झाला आहे, असे डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

दोन दिवसांत प्रचंड पाऊस एका तासात १० सेंटीमीटर पाऊस झाला, तर त्याला ढगफुटी बोलतात. लोहगावात १४४ मिमी, वडगावशेरीत १२० मिमी पावसाची नोंद झाली. तसेच कात्रजला ११७ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाजीनगरला ६८ मिमी पाऊस पडला. यावरून हा ढगफुटीसारखाच पाऊस आहे.

पावसाचे प्रकार४-५ सेंटिमीटर (४५ मिमी) - तीव्र पाऊस६-७ सेंटिमीटर - अतितीव्र पाऊस८ ते ९ सेंटिमीटर - अतिवृष्टी१० सेंटिमीटर ते त्याहून अधिक - ढगफुटी

एका तासात किती पाऊस आला, त्यावरून ढगफुटी समजली जाते. १ सेंटीमीटर म्हणजे १० मिलीमीटर पाऊस समजला जातो. पुण्यात शंभरहून अधिक मिमी पाऊस नोंदवला गेला, त्यामुळे तिथे ढगफुटीसारखा पाऊस झाला, असे म्हणता येईल. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

अधिक वाचा: Irrigation Project राज्यात भविष्यातील सर्व सिंचन योजना पाइपद्वारेच

टॅग्स :हवामानपाऊसपुणेतापमानपाणी