Join us

मराठवाड्यात पुढील पाच दिवस ढगाळ, कोरड्या हवामानाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 2:14 PM

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? कृषी विज्ञान केंद्राने केली पिकनिहाय शिफारस..

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ राहून दिनांक 05 व 06 जानेवारी, 2024 रोजी आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर ५ ते ११ जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकावरील खोडमाशी, खोडकिडी व लष्करी अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमुरीया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10 लिटर  किंवा थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास पोटरी येण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे.मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.रब्बी सूर्यफूल फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत. मृग बाग धरलेल्या केळी बागेत घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत झाडांना काठीचा आधार द्यावा. आंबा बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारण करू नये. द्राक्ष बागेत सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा.

सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

लोह समृध्द पदार्थ-कुटुंबाच्या दैनंदिन आहारात बदल करून लोहाच्या कमतरतेमूळे उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून विविध पाककृती मदत करतात. आपल्याकडे अनेक हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्या खनिज समृध्द असून या भाज्यांची  विविध पाककृतीमध्ये उपयोग करावा.

ताज्या भाज्यांच्या तुलनेत सुकवलेल्या भाज्यांच्या पावडर मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वापरातील पालक, कोथिंबीर, शेवग्याची पाने आणि कढीपत्याची पाने सुकवून त्याची पावडर बनवून लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी विविध पाककृतीमध्ये वापरावी

टॅग्स :हवामानतापमानपीक व्यवस्थापनपीक