राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मराठवाड्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आधीच पावसाने फळबागा आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले असताना फुलशेतीही धोक्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 05 ते 07 डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील तीन दिवसात किमान तापमानात किंचित वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. येत्या दोन दिवसात मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहणार असून तूरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.८ ते १४ डिसेंबर दरम्यान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे.
अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने झालेल्या फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने फळबागांचे व्यवस्थापन आणि भाजीपाल्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी सांगितले आहे.
फळबागांचे व्यवस्थापन कसे कराल?
- अवकाळी पावसाने झालेल्या मोसंबी फळबागांमध्ये मोठे नुकसान झाले.
- वादळी वारा, पाऊस झालेल्या संत्रा/मोसंबी बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी व त्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
- सद्यस्थितीत संत्रा, मोसंबी, लिंबू या फळपिकामध्ये फळधारणा झालेली असल्यास एन.ए.ए 4 मिली + 13:00:45 या खताची 150-200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
- वादळी वारा, पाऊस झालेल्या आंबा बागेत मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी व त्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
- आंबा पिकामध्ये भूरी रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गंधक सल्फर 80% 40 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 5 एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
ढगाळ हवामान आणि आंबा बागेचे व्यवस्थापन
भाजीपाला
- काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वारा, पाऊस झालेल्या ठिकाणी प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा.
- मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात (टोमॅटो, मिरची, वांगी) करपा या रोगांचा प्रादूर्भाव होऊ शकतो या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब 75% किंवा क्लोरोथॅलोनील 75% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पशुधनासाठी चारा म्हणून ज्वारी व मका पिक घ्यावे. मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे सोयाबीनचा भुसा भिजला असल्यास तो सुकवून 2% मिठाची प्रक्रिया करून जनावरांना द्यावा.