यंदाच्या वर्षीचा थंडीचा पॅटर्न जरासा बदलला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि अल निनोच्या प्रभावामुळे हा परिणाम झाला आहे. पहाटे थंडी कमी वाटत असून दिवसाची थंडी पहाटेपेक्षा जास्त जाणवत असल्याचं चित्र आहे. त्यानिमित्ताने हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी नोंदवलेले निरिक्षणे.
रविवार दि. १० डिसेंबर २०२३
१- डिसेंबरची सध्याची थंडी -२०२३ च्या एल-निनो वर्षात दरवर्षासारखी थंडी नाही. ह्यावर्षी ती कशी वळण घेऊ शकते, हे बघणेही गमतीशीर आहे. शुक्रवार दि. ८ डिसेंबरपासून डिसेंबर महिन्याच्या थंडीला जरी सुरवात झाली असली तरी, सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवतो आहे.
२- दुपारचे सध्याचे कमाल तापमान व त्याचा परिणाम -विदर्भ वगळता, कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान हे २७ डिग्री से. ग्रेडच्या तर विदर्भात २५ डिग्री से. ग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. म्हणजेच दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा विदर्भात जवळपास ४ डिग्री से. ग्रेडने तर कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात २ डिग्री से. ग्रेडने कमी आहे. दुपारच्या तापमानातील ही ठळक व स्पष्ट जाणवणारी मोठी गिरावट आहे. त्यामुळे दिवसा चांगलीच थंडी जाणवत आहे.
३-पहाटेचे सध्याचे किमान तापमान व त्याचा परिणाम-खरेतर डिसेंबर हा अति थंडीचा महिना मानला जातो. आणि थंडीच्या तीव्रता मोजण्याचा (म्हणजे थंडी कमी किंवा जास्त ) हा ' किमान तापमान किती आहे?' हेच ठरवते. म्हणजे थंडी तीव्रता ठरविण्याचा निर्देशक घातांक किमान तापमानच आहे.सध्याचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे. तरच चांगली थंडी जाणवते. परंतु ह्या वर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १७ डिग्री से. ग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. हे दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा कोकण व दक्षिण महाराष्ट्रात २ डिग्री से. ग्रेडच्या तर उर्वरित महाराष्ट्रात जवळपास ४ डिग्री से. ग्रेडने अधिक आहे. त्यामुळे थंडी जाणवण्यास सुरवात झाली पण त्याचा म्हणावा तसा कडाका जाणवत नाही.
४-डिसेंबरची सध्याची सापेक्ष आर्द्रता व त्याचा फायदा-संपूर्ण महाराष्ट्रात सध्या डिसेंबर महिन्यात दैनिक सापेक्ष आर्द्रता सकाळच्या वेळेस ७५ ते ८५ % आसपास तर दुपारनंतरची सापेक्ष आर्द्रता ही ५५ ते ६५% दरम्यान जाणवत आहे. हे दरवर्षीच्या डिसेंबर महिन्यातील सरासरी सापेक्ष आर्द्रतेपेक्षा जवळपास १० ते २०% ने कमी आहे. ही ठळक व स्पष्ट जाणवणारी मोठी % गिरावट आहे. त्यामुळे दिवसा चांगलीच थंडी तर वाजतेच पण निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाशाला अडथळा नसल्यामुळे तोही भरपूर असला तरी, ह्या दिवसात दिवसाची लांबीही कमी असते. आणि अश्या परिस्थितीत दैनिक सापेक्ष आर्द्रताही सरासरीपेक्षा खुप आणि खुपच घसरली आहे. साहजिकच दमटपणा कमी आहे. हवेत कोरडेपणा वाढला आहे आणि म्हणून सध्या वाढलेल्या किमान तापमानातही सकाळी थंडी वाजत आहे.
५- उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे वहनही कमी आहे. उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात वायव्येकडून पूर्वेला मार्गस्थ होत आहे. त्यामुळे तेथे थंडी व बर्फ पडत आहे. परंतु ती थंडी खेचण्यासाठी पुरेसे कमी दाब क्षेत्रे महाराष्ट्रात नसल्यामुळे ईशान्यई वारे कमकुवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भू-भागावर मूळ स्रोताचे थंड वारे लोटले जात नाही. म्हणून कडाक्याच्या थंडीचा अभाव दिसत आहे.
६- थंडीचा हा पॅटर्न कदाचित संपूर्ण हिवाळ्यात म्हणजे फेब्रुवारीअखेरपर्यन्त असाच राहू शकतो असे वाटते. फेब्रुवारी व मार्च मध्ये होणारी गारपीटही कमी होवु शकते. दव, बादड पडण्याचे प्रमाणही कमी राहू शकते.
७- सध्या प्रतिकूल वातावरणामुळे सकाळी दव किंवा बादड विशेष पडत नाही. म्हणजे दरवर्षी पडते त्यापेक्षा कमी आहे. निरभ्र आकाश, शांत वारा, जमिनीतील कमी ओलावा, जमिनीपासून २-३ किमी टक्केवारीत कमी असलेली (साधारण साठ सत्तरीकडे झुकणारी) सापेक्ष आर्द्रता, निरभ्र आकाशामुळे सूर्याकडून येणारी व जमिनीला मिळणारी पुरेशी उष्णता, पहाटचे किमान तापमान व दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा जवळपास तीन डिग्री ने वाढ, असमान हवेचा दाब म्हणजे पहाटच्या व उशिरा सकाळपर्यंत त्यात होणारा लक्षणीय बदल, रात्रीचा वाढलेला दवांक निम्न पातळी(खोली)चा निर्देशंक सध्याच्या ह्या सर्व वातावरणीय कारणामुळे सध्या पहाटच्या वेळी खुप बादड पडत नाही. त्यामुळे शेतपिकांना फायदा होत आहे.
८- ह्या महिन्यअखेरपर्यंतच चक्रीवादळ व आयओडी चा काळ असून नंतर संपणार आहे. एल-निनो त्याच्या तीव्रतेत असल्यामुळे डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असुन झाला तरी तो डिसेंबर महिन्याच्या मासिक सरासरीपेक्षा कमी असू शकतो, असे वाटते.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd.) IMD Pune.