भारतीय हवामान विभागाने देशातील अल निनोची स्थिती बळकट होत असल्याचे नोंदवत भारतीय हवामान विभागाने नोव्हेंबर महिन्याच्या हवामानाचा अंदाज नुकताच वर्तवला. या अंदाजात वायव्य आणि पश्चिम- मध्य प्रदेशातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा चढेच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीसाठी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.
या अंदाजानुसार सध्या देशात अल निनोचा प्रभाव वाढताना दिसत आहे. परिणामी देशातील तापमानात नोव्हेंबरमध्ये सामान्य तापमानाच्या तुलनेत वाढ दिसून येईल.राज्यातही थंडीचा जोर काहीसा उतरण्याची शक्यता असून तापमानात सरासरीहून अधिक वाढ होईल.
पॅसिफिक आणि भारतीय उपसागरात होणारे बदल हे भारतातील तापमानावर प्रभाव पाडतात. तापमानाच्या अंदाजाव्यतिरिक्त आयएमडीने पावसाचाही अंदाज व्यक्त केला आहे. वायव्य भारतातील बहुतांश भाग आणि पूर्व मध्य, पूर्व-इशान्य भारतात सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदा थंडी काहीशी कमी राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. नोव्हेंबर महिन्यात काही ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे. अरबी समुद्र आणि केरळच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडू राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात घट झाल्याचे पहायला मिळाले. ऑक्टोबर हीट ओसरून तापमानाचा पारा उतरू लागला आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार अल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे देशातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सततच्या हवामान बदलांमुळे यंदा कडाक्याच्या थंडीची आणखी काही आठवडे वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.