हवामानात सातत्याने होणारे चढ उतार होत असताना राज्यात आता पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून किमान तापमानात घट होताना दिसत आहे. थंडीचा जोर हळूहळू वाढत असताना बांधावरील तूरीला पोषक वातावरण निर्माण झाले असून रब्बी पीकांसाठी याचा फायदा होणार आहे.
राज्यात ऑक्टोबर हीट, चक्रीवादळ, अचानक झालेला पाऊस तसेच ढगाळ, कोरडे वातावरण असे सलग बदल घडत आहेत. परिणामी खरीप पीकांवर या वातावरणाचा मोठा परिणाम पहायला मिळाला. ढगाळ वातावरणामुळे पीकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. आता राज्यात तापमानाचा पारा घसरत असून रब्बी पेरण्यांसाठी कडधान्य पीकांना वाढती थंडी फायद्याची ठरत आहे.
"रब्बी पिकांच्या वाढीसाठी थंडी पोषक असते. रब्बीतले पीक थंड वातावरणात चांगले वाढते. ही थंडी वाढीसाठी चांगली असते. अजून पेरण्या झाल्या नाहीत. काही दिवसात तापमानात पुन्हा चढ-उतार होईलच. मात्र, या थंडीमुळे पिकांवर रोग पडत नाही.''- 'शिवा काजळे, हवामान शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर
आता राज्यात खरीप पीकांची काढणी सुरू असून रब्बीच्या लागवडीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागांमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून ऑक्टोबर हीट ओसरली आहे. शेतकऱ्यांना थंडीची चाहूल लागली आहे.
हिवाळा सुरु झाला की हळूहळू दिवस लहान आणि रात्र मोठी होऊ लागते. आभाळ निरभ्र, हवेत कोरडेपणा जाणवत असून पहाटे धुके आणि गारठा जाणवू लागतो. राज्यात हवेत काहीसा गारठा जाणवू लागला असून ग्रामीण भागात सकाळच्या वेळी तापमानात घट पहायला मिळत आहे. काल जळगाव जिल्ह्यात ११ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे तापमान १४.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले. परभणी १५ अंशावर पोहोचले होते.
राज्यात दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवत असले तरी किमान तापमानात १ ते २ अंशांने घट होणार असल्याचे हवामान विभागानेही सांगितले आहे. यावर्षी नोव्हेंबरच्या मध्यापासून थंडीचा जोर वाढणार असून कडाक्याच्या थंडीसाठी डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सध्या रात्रीच्या सुमारास तापमानात घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.
रब्बी पीकांसाठी थंडी पोषक
धान्याची कापणी झालेल्या शेतात शेतकऱ्यांनी आता रब्बीची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी अजूनही कापण्या सुरू असून मशागतीची कामे सुरू आहेत. सध्या थंडी पडत असल्याने खरीप हंगामात परलेल्या बांधावरील तूरीला वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच रब्बीतील कडधान्य पीकांसाठी वाढती थंडी फायद्याची ठरणार आहे.