Cold Wave In Maharashtra: देशातील उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली आहे. पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात प्रचंड गारठा वाढला आहे.
येत्या दोन दिवसांत राज्यातील तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात थंडी वाढल्याने विविध ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
देशातील उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. राज्यात धुळ्यासह निफाड, गोंदिया, नागपूर, वर्धा येथील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या आठवड्यात थंडीची लाट येण्याचा इशारा नाही. हिवाळा सुरू झाला आहे आणि तापमानात घट अपेक्षित आहे. मुंबईत तापमान १४-१५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले की थंडी जाणवते. सध्या मुंबईच्या हवामानाचा विचार करता किमान तापमान २०-२१ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३०- ३३ अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल. संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस राहील तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहील असे कळविण्यात आले आहे.
थंडीत अशी घ्या काळजी
थंडीच्या दिवसात आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पोषक आहार घेणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे या गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण आजाराला दूर ठेऊ शकतो.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* केळी बागेस पोटॅश ५० ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल १०% ईसी १० मिली किंवा मेटीराम ५५% + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५% डब्ल्यू जी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड २० मिली प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बूडवावेत. द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.