सोलापूर : यावर्षी हिवाळा ऋतू उशिरा सुरू झाला. आता कुठे थंडी जाणवू लागली असताना पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाचा अनुभव सोलापूरकरांना येणार आहे. २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान थंडीत घट होऊन आकाशात ढग येतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
फक्त सोलापूरच नव्हे, तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या तापमानात घट होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शहरात थंडीचा अनुभव येत आहे. राज्यात बहुतांश भागात १३ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहिले.
सोलापुरात देखील १६ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. आणखी आठवड्यावर सोलापूरकरांना थंडीचा अनुभव येणार आहे. गुरुवारी (२१ नोव्हेंबर) कमाल तापमान ३१.६ तर किमान तापमान १७.० अंश सेल्सिअस इतके होते.
१९ नोव्हेंबर रोजी सोलापूरचे किमान तापमान हे १६.८ इतके होते, तर २० रोजी त्यात वाढ होऊन १७. ६ अंशांवर सोलापूरचे तापमान होते. कमाल तापमानात किंचितशी घट, तर किमान तापमानात किंचितशी वाढ पाहायला मिळाली.
नोव्हेंबर महिन्याच्या २७ तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. रविवारपासूनच थंडीत वाढ होताना दिसून येत आहे. आठवडाभर असेच हवामान राहण्याची शक्यता आहे. या वातारवणातील आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवेच्या उच्च दाबाचा परिणाम
हरियाणा, पंजाब आणि राजस्थान दरम्यान हवेच्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्याचा परिणाम म्हणून थंडीत वाढ होत आहे. २७ नोव्हेंबरपासून थंडीत घट होण्याची शक्यता आहे. २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान सोलापूरसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल. काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.