विजय मानकर
यंदा मृग नक्षत्रात पावसाचे वाहन कोल्हा असताना ७ जूनला पावसाचे वाहन कोल्हा होते. मृगनक्षत्रातील पहिले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीच्या कामात मदत मिळाली होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतीच्या कामात अडथळा आला.
५ जुलैपासून पावसाने हत्तीला वाहन बनविले पण सरासरी पाऊस घेऊन येणाऱ्या हत्तीने हुलकावणी दिली. १९ जुलैला पाऊस बेडकावर स्वार होऊन आला आणि दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा फटका बसला. आता २ ऑगस्टपासून पाऊस गाढवावर स्वार होत असून दमदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदा समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार आतापर्यंत हवामान खात्याचा अंदाज बऱ्यापैकी खरा ठरत असला तरी निम्मा पावसाळा बाकी असून पुढे पाऊस कसा राहील हे नेमके सांगता येणार नाही. अनेकवेळा हवामान खात्याच्या अंदाजसुद्धा चुकीचा ठरतो. पावसाळ्यातील ९ नक्षत्रांमध्ये पावसाचे वाहन ठरवितात. त्यानुसार पावसाचा अंदाज ठरविला जातो.
पावसाच्या वाहनांमध्ये हत्ती, बेडूक, म्हैस असेल तर भरपूर प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असते, उंदीर, गाढव, मेंढा असेल तर कमी पाऊस पडतो. जर कोल्हा, घोडा व मोर असेल तर मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असते. यंदा बेडकाने भरपूर प्रमाणात पाऊस पाडला. आता पुढे गाढव काय करणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
यंदाच्या पावसाळ्यातील नक्षत्र आणि वाहन
दिनांक | नक्षत्र | वाहन |
७ जून. | मृग. | कोल्हा. |
२१ जून. | आर्दा. | मोर. |
५ जुलै. | पुनर्वसू, | हत्ती. |
१९ जुलै. | पुष्य. | बेडूक. |
२ ऑगस्ट. | आश्लेषा. | गाढव. |
१६ ऑगस्ट. | मघा. | कोल्हा. |
३० ऑगस्ट. | पूर्वा. | उंदीर. |
१३ सप्टेंबर. | उत्तरा. | हत्ती. |
३० सप्टेंबर. | हस्त. | मोर. |
१० ऑक्टोबर. | चित्रा. | म्हैस. |
बरेचदा चुकतो अंदाज
हवामान विभागाने काढलेला अंदाज हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर उपग्रहाच्या सहाय्याने काढलेला असतो तो एका वर्षासाठीच असतो. त्यावर्षी दक्षिण ध्रुव क्षेत्रात निर्माण होणारा मान्सून, मान्सून वाऱ्यांची गती निर्माण होणारे ढग यांचे टिपलेले छायाचित्र यांच्या आधारावर हवामान तज्ज्ञ आपल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अंदाज काढतात. त्यामुळे ते जास्त विश्वसनीय मानले जाते परंतु हा अंदाजसुद्धा चुकत असतो.