Join us

मिचांग चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम, विदर्भावर पावसाची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 05, 2023 7:00 PM

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेशच्या समुद्रावर

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचांग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. राज्यात विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ डिसेंबरपर्यंत विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून त्याची तीव्रताही वाढणार आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा,ओडिशा, छत्तीसगड राज्यांसह राज्यात विदर्भात पाऊस होणार आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्रांनी दिला आहे. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेशच्या समुद्रावर आहे. यावेळी वाऱ्याचा वेग १२ किमी प्रतितास राहणार असून मिचांग चक्रीवादळ सक्रीय होणार आहे. त्यामुळे या भागात आजपासून चक्रीवादळाचा वादळी परिणाम होणार असल्याचे भारताीय हवामान विभागाने सांगितले आहे. 

पुण्यात पुढील ७२ तासांमध्ये सकाळी धुक्याचे वातावरण राहणार असून ७ डिसेंबर पर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमान घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :चक्रीवादळपाऊसविदर्भ