Join us

Dam storage: सामान्य पाणीसाठ्याच्या तुलनेत राज्यात यंदा 11 टक्क्यांची तूट 

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 10, 2024 10:50 AM

सामान्य धरणसाठा आणि तूट याचा कसा संबंध? केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार...

यंदा कमी पाऊस पडल्याने देशातील धरण साठ्यांमध्ये मोठी तूट दिसून येत असून सामान्य पाणी साठ्याच्या तुलनेत महाराष्ट्रात यंदा पाणीसाठ्यात अकरा टक्क्यांची तूट केंद्रीय जल आयोगाने नोंदवली आहे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील एकूण दीडशे जलसाठ्यांमध्ये दिनांक 4 एप्रिल रोजी 83% जिवंत पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी हा साठा 98 टक्क्यांवर होता. 

देशातील एकूण 150 जलसाठ्यांपैकी 20 जलसाठ्यांवर जलविद्यूत प्रकल्प आहेत. ज्यामध्ये आता ३५ .२९९ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. देशात पश्चिम विभागातील गुजरात व महाराष्ट्र राज्यात 49 जलसाठे आहेत जात आता 37.130 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. 

सामान्य पाणीसाठा म्हणजे नक्की किती? 

मागच्या दहा वर्षातील सरासरी साठा म्हणजे सामान्य पाणीसाठा. जेव्हा धरण साठ्याची तुलना सामान्य पाणीसाठ्याशी केली जाते तेव्हा मागील दहा वर्षातील सरासरी ग्राह्य धरली जाते. ही तुलना करताना सामान्य पाणीसाठ्याच्या जवळ जाणारा साठा 20 टक्क्यांपर्यंत असेल तर तो सामान्य समजला जातो. 

उदाहरणार्थ महाराष्ट्रातील धरणांमध्ये यंदा अकरा टक्क्यांची तूट आहे. 20 टक्क्यांचा खाली ही तूट असल्याने ही सामान्य जलतूट आहे. कर्नाटकात ही तूट 22% असून 20 टक्क्यांच्या वर हा आकडा गेल्याने सामान्य पाणीसाठ्याच्याही कमी धरणासाठा आहे.

टॅग्स :धरणपाणीपाणीकपात