Dam Storage:
लातूर :
पाऊसकाळ चांगला झाल्यानंतर मांजरा नदी लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील गावांचीच तहान भागवत नसून, कर्नाटकालाहीपाणी देते. आमच्या या जीवनदायीने यंदा पाच दिवसांत कर्नाटकात ३१.२२४ दलघमी पाणी दिले आहे.
मांजरा धरण २५ सप्टेंबरला भरल्यापासून दररोज दोन किंवा सहा दरवाजांद्वारे विसर्ग नदीपात्रात सोडला. त्यातून हे पाणी कर्नाटकात गेले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उगलवाडी येथे मांजरा नदीचा उगम आहे.
या उगमस्थानापासून केज तालुक्यातील धनेगाव येथे ७.९१ टीएमसी साठवण क्षमतेचा मांजरा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या वरही दोन मध्यम प्रकल्प या नदीवर आहेत. हे तीन प्रकल्प भरल्यानंतर मांजरा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
२५ सप्टेंबर रोजी दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यातून ३.०८ दलघमी पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले. २५ ते २ ऑक्टोबरपर्यंत ३१.२२४ दलघमी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी कर्नाटकात गेले आहे.
पाटोदा तालुक्यातून उगलेवाडी येथून येणारी ही मांजरा नदी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील वांजरखेडा येथे तेरणा नदीला मिळते. या दोन्ही नद्यांचा इथे संगम होतो. तेरणा-मांजरा संगम होऊन कर्नाटक राज्यात वाहते. यंदा मांजरा प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यामुळे कर्नाटक, तेलंगणात या नदीचे पाणी गेले आहे.
आवक कमी झाल्याने दरवाजे केले बंद
सध्या मांजरा धरणात पावसाचा येवा सुरू असला तरी दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे येवा कमी आहे. म्हणूनच २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मांजरा धरणाचे गेट क्र. ६ व १ हे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती शाखाधिकारी सुरज निकम यांनी दिली.
सरासरीपेक्षा दोनशे मि.मी. पाऊस अधिक
मांजरा प्रकल्प क्षेत्रातील पावसाची वार्षिक सरासरी ७०० आहे. मात्र आतापर्यंत ९०८ मि.मी. पाऊस मांजरा प्रकल्प क्षेत्रात झाला आहे. वार्षिक सरासरीपेक्षा २०० मि.मी. पाऊस अधिक झाला आहे. सध्याही मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. आता पाऊस कमी झाला असल्याने मांजरातील आवक कमी होत आहे.
२५ सप्टेंबरपासून पाण्याचा विसर्ग
सप्टेंबर महिन्यात यंदा मांजरा प्रकल्प भरला असून, तर ऑगस्ट महिन्यात मांजराच्या वर असलेले महासांगवी आणि संगमेश्वर मध्यम प्रकल्प भरले. त्यामुळे धनेगाव धरण भरण्यास वेळ लागला नाही. २५ सप्टेंबरपासून विसर्ग करण्यात आला आहे. - सुरज निकम, शाखाधिकारी
१ टीएमसी पाणी
२८.३१ दलघमी म्हणजे १ टीएमसी पाणी. मांजरा धरणाची साठवण क्षमता ७.९१ टीएमसी आहे. ते भरून १ टीएमसीपेक्षा अधिक पाणी नदीपात्रातून खाली सोडून देण्यात आले आहे. ते कर्नाटक राज्याला मिळाले. धाराशिव, बीड जिल्ह्यात पडलेल्या पावसाचे पाणी या नदीपात्रास मिळून कर्नाटक राज्यातही जाते, हे यावरून स्पष्ट झाले आहे. पाटोदा तालुक्यातून उगलेवाडी येथून येणारी ही मांजरा नदी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील वांजरखेडा येथे तेरणा नदीला मिळते. या दोन्ही नद्यांचा इथे संगम होतो.
असा झाला नदीपात्रातून विसर्ग (दलघमी)
२५ सप्टेंबर | ३.०८ |
२६ सप्टेंबर | ७.३९ |
२७ सप्टेंबर | ९.७८९ |
२८ सप्टेंबर | २.४० |
२९ सप्टेंबर | 00 |
३० सप्टेंबर | ४.२७५ |
१ ऑक्टोबर | ४.२७५ |
एकूण | ३१.२२४ (दलघमी) |