Dam Storage :
जून महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार कमबॅक केले. पंधरा दिवस वरूणराजा धुवाँधार बरसला. त्यामुळे उन्हाळ्यात तळाला गेलेल्या प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली. यवतमाळ शहराला चापडोह व निळोणा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. हे दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शहरवासीय 'नो टेन्शन' मूडमध्ये आहेत.
जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम आणि ६५ लघु प्रकल्प आहेत. पूस, अरुणावती, बेंबळा या तीन मोठ्या प्रकल्पांत ६१.७० टक्के जलसाठा आहे,
तर मध्यम असलेल्या गोकी, वाघाडी, सायखेडा, लोअरपूस, बोरगाव, अड़ाण, नवरगाव या प्रकल्पांत ८५.८२ टक्के जलसाठा आहे.
६५ लघु प्रकल्पांत ६५.७८ टक्के जलसाठा असून, एकूण टक्केवारी ६९.२२ इतकी आहे.
जुलै महिन्यात पंधरा दिवस वरूणराजाने चांगली हजेरी लावल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. यवतमाळला पाणीपुरवठा करणारे प्रकल्प आता ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत.
रबी हंगामात मिळणार सिंचनासाठी पाणी
• खरीप हंगामात निसर्गाच्या भरवशावर जिल्ह्यातील कोरडवाहू जमीन असलेले शेतकरीशेती करतात. शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना नफा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळत असल्याने शेतकरी हा हंगाम कॅश करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा आहे.
यवतमाळकरांना करावी लागते पायपीट
• उन्हाळा आला की, यवतमाळकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहराला पाणीपुरवठा करणारे चापडोह व निळोणा प्रकल्प वाढत्या लोकसंख्येमुळे लहान पडत असून, जुनेदेखील झाले आहेत. जुनी पाइपलाइन ठिकठिकाणी लिकेज झाल्याने पाण्याचा अपव्यय होतो. उन्हाळ्यात आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. टंचाई काळात विकतचे पाणी घेण्याची वेळ येते.
मोठे व मध्यम धरणांतील जलसाठा
प्रकल्प टक्केवारी
पूस १००
अरुणावती ५५.१७
बेंबळा ५०.११
गोकी १००
वाघाडी १००
सायखेडा १००
अधरपूस ७७.५१
बोरगाव १००
अडाण ६७.४८
नवरगाव १००
अखेरचा शेतकरी वंचित
कोट्यवधी रुपये खर्च करून मोठे प्रकल्प बांधण्यात आले आहेत. मात्र, अजूनही टेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने अखेरच्या शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागते. अनेक ठिकाणी कालवेदेखील नादुरुस्त आहेत. प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, अशी मागणी वंचित शेतकऱ्यांकडून वारंवार होते. मात्र, त्यांची मागणी पूर्ण होताना दिसत नाही.