यावर्षीच्या उन्हाळ्या अखेर म्हणजेच ३१ /०५/२०२४ रोजी व यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला एक जून 2024 रोजी राज्यातील मराठवाड्यासह सर्वच महसूल विभागातील महत्त्वाच्या धरणांमधीलपाणीसाठा अत्यंत कमी झालेला असून मराठवाड्यातील व उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक धरणे कोरडी पडलेली आहेत. बहुतेक धरणांचा पाणीसाठा हा मृत पाणीसाठ्या च्या खाली गेलेला असून सर्वत्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गतवर्षी 31 मे 2023 रोजी राज्यातील सर्वच विभागांतील महत्त्वाचे प्रमुख धरणांमध्ये पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यावर्षी मराठवाड्यातील प्रमुख ९ ते १० प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा हा अत्यंत कमी म्हणजे सुमारे २३ टीएमसी इतकाच शिल्लक राहिलेला आहे.
मराठवाड्याचा धरणसाठा किती?
मराठवाड्यासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणातील 31 मे 2024 रोजी चा एकूण पाणीसाठा सुमारे 29.69 टीएमसी व उपयुक्त पाणीसाठा फक्त 3.625 टीएमसी म्हणजेच (4.73%) इतका शिल्लक राहिला असून तो गतवर्षीपेक्षा सुमारे 25% टक्क्यांनी कमी आहे. जायकवाडी धरणातील बाष्पीभवन व्यय (Evaporation losses) या वर्षात सुमारे 8.42 टीएमसी,(8.20%) इतका नोंदवण्यात आला आहे.
नाशिक विभागात १६ टक्के!
नाशिक जिल्ह्यातील एकूण प्रमुख पंचवीस(25) धरणांमध्ये 1जुन 2024 चा उपयुक्त पाणीसाठा हा गतवर्षीपेक्षा(13.097 टीएमसी )सुमारे 16% टक्क्यांनी कमी म्हणजेच फक्त 5. 048 टीएमसी इतकाच शिल्लक राहिलेला आहे.
संगमनेर तालुक्यातील निमोण तळेगाव या विभागासाठी काही अंशी वरदान ठरलेले भोजापूर धरण देखील मे महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यानंतर मृतसाठ्याचे खाली गेलेले आहे.
अहमदनगर विभागातील धरणांमध्ये..
आज 1जुन 2024रोजी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात एकुण 1047 दलघफुट (9.48%), निळवंडे धरणात 659 दलघफुट म्हणजेच (7.92%)तसेच मुळा धरणात 6378 दलघफुट ( 24.53%),आढळा धरणात 372 दलघफुट (35.09% )इतकाच पाणीसाठा सद्यस्थितीत शिल्लक आहे.
भंडारदरा व निळवंडे धरणातून आता फक्त पिण्यासाठीच 2 आवर्तने सोडण्यात येणार आहेत.त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील उर्वरित धरणांमध्ये जवळपास सरासरी १०% पाणीसाठा शिल्लक असून बहुतेक पाझर तलाव, लपातलाव, मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत.
पुणे विभागातील प्रमुख धरणांमध्ये किती साठा?
भीमा खोऱ्यातील पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 24 प्रमुख धरणांमध्ये सुमारे 20 .65 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याच विभागातील राज्यात सर्वात मोठे असलेले उजनी धरणामध्ये( साठवण क्षमता:--117.2427 टीएमसी) 1जुन 2024 रोजी एकूण पाणीसाठा 31.69 टीएमसी म्हणजे 27.02% व उपयुक्त पाणीसाठा उणे (-)31.97 टीएमसी म्हणजेच उणे (-)59.67% इतका शिल्लक राहिलेला असुन तो गतवर्षीपेक्षा सुमारे 36% इतका कमी आहे. याचबरोबर पुणे विभागातील कृष्णा खोऱ्यामधील प्रमुख तेरा धरणांमध्ये आजमितीस 30 सुमारे 30.44 टीएमसी म्हणजेच 17.19% इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळते आहे.
खडकवासला धरण समूहामध्ये आजमितीस सुमारे 5.19 टीएमसी म्हणजेच (17. 79% )टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून तो गतवर्षीपेक्षा सुमारे 6% टक्क्यांनी कमी आहे.. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धरणापैकी एक असलेल्या कोयना धरणामध्ये आज 31मे 2024रोजी एकूण सुमारे 18.37 टीएमसी(17.45%) इतका पाणीसाठा व 13.25 टीएमसी(13.23%) इतका उपयुक्त पाणी साठा शिल्लक असुन तो जवळपास गतवर्षी इतकाच (13.44)%आहे .
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धरणात पुरेसा साठा पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात तील धरणांमध्ये पिण्यासाठी पुरेसा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून मुंबई, ठाणे व इतर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोकणातील प्रमुख 4 धरणांमध्ये देखील पाणीसाठा (14.43 टीएमसी) पूर्वीपेक्षा निश्चितच कमी झालेला आहे(29.57%).
तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाच(५) धरणांमध्ये एकूण सुमारे 3.78 टीएमसी इतका पाणीसाठा असुन ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावे धरणात सुमारे 3.43 टीएमसी म्हणजेच 28.69% इतका पाणीसाठा आहे.
अमरावती विभागातील ७ धरणांमध्ये..
तसेच अमरावती विभागातील प्रमुख ७ धरणांमध्ये सुमारे 14.73 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 14.15% इतकी आहेत्यामुळे राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असून यापुढे पावसाळा वेळेवर सुरू न झाल्यास निश्चितपणे तीव्र पाणीटंचाईला राज्यातील जनतेला सामोरे जावे लागणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत ज्या योजना पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्या जात आहेत त्यासाठी कायमस्वरूपी पाणी ऊदभव( Assured sources of water) निर्मिती करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत हजारो कोटी रुपये खर्च करून सुरू असलेल्या पाणी योजनांचे उदभव कोरडे पडलेले असून यापुढेही उन्हाळ्यामध्ये नक्कीच हे उदभव कोरडे पडणार असल्याने या उदभवा करिता निश्चितपणे पिण्याच्या पाण्याचा पाणीसाठा राखीव व जतवणुक, संस्करण करून ठेवावा लागणार आहे. अन्यथा हजारो कोटी रुपये खर्च करून देखील पिण्याच्या पाण्याच्या अडचणींना जनतेला यापुढे सामोरे जावे लागणार आहे.
याकरिता सद्यस्थितीत असलेली धरणे ,मध्यम प्रकल्प ,लपा तलाव, पाझर तलाव यामधील साठलेला गाळ काढणे अत्यावश्यक असून यापूर्वी बांधण्यात आलेल्या धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
घाटमाथ्यावरून वाहून जाणारे पाणी वळवा
त्याकरिता पश्चिम घाट माथ्यावरून कोकणात वाहून जाणारे सुमारे 115 टी.एम.सी.(सुधारित अभ्यास व अंदाजानुसार वाढ होऊ शकते )अतिरिक्त पाणी गोदावरी, कृष्णा व तापी खोऱ्यामध्ये वळविणे च्या व नदी जोड प्रकल्प निर्मिती करणेचे दृष्टीने राज्य सरकार व केंद्र सरकारने महत्त्वकांक्षी प्रकल्प अथवा योजना ही युद्ध पातळीवर हाती घेऊन पाणी वळविणे अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून पिण्याच्या पाण्याची टंचाई व त्याचप्रमाणे सिंचनासाठी लागणारे पाणी मराठवाडा- नगर नाशिक, कृष्णा खोरे तापी खोरे यामधील पाण्यासाठी होणारा संघर्ष टाळणे अतिशय गरजेचे बनलेले आहे .
♦️यामध्ये राज्य व केंद्र शासनाने तातडीने पावले उचलुन यासाठी येत्या पाच-सहा वर्षांमध्ये योजनाबद्ध कार्यक्रम निश्चित करून त्याची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर अंमलबजावणी होणे साठी लोकप्रतिनिधी व शासनाने पुढाकार घेणे अत्यावश्यक बनले आहे .मात्र नेहमीप्रमाणे याबाबतीमध्ये निव्वळ घोषणा व चालढकल करून चालणार नाही याची दखल मायबाप सरकारने घेणे आवश्यक असल्याचे मत व त्याचप्रमाणे सर्वांनी," जल है तो जीवन है" या उक्तीप्रमाणे पाणी काटकसरीने वापरणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत सेवा निवृत्त इंजिनिअर व जलसंपत्ती अभ्यासक हरिश्चंद्र र.चकोर यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
♦️राज्यातील तीन प्रमुख धरणांमधील पाणीसाठा खालीलप्रमाणे
१) जायकवाडी धरण पाणीसाठा एकूण--29.60 टीएमसी(28.32%) उपयुक्त-- 3.58 टीएमसी (4.61%)
२) उजनी धरण एकूण--- 31.69 टीएमसी (27.02%) उपयुक्त-- उणे(-)31.97 टीएमसी (-59.67%)
३) कोयना धरण एकूण---- 18.37 टीएमसी(17.45%) उपयुक्त-- 13.25 टीएमसी टीएमसी(13.23%)