वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात वरुणराजा रुसून बसला आहे. २३ जुलैपर्यंत धरणात केवळ २५.८१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात आजतागायत ३०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जलसाठ्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात लवकर समाधानकारक पाऊस न पडल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्यात कपातीची वेळ येऊ शकते. त्यामुळे चिंता वाढली आहे.
परिसरात योग्य पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, बहुतांश नद्या, नाले, तलाव, पाझर तलाव कोरडेच असल्याचे चित्र आहे. गतवर्षी २३ जुलै २०२३ ला हनुमान सागर धरणात ५९.३८ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणाची जलाशय पातळी तब्बल ३३.५७ टक्क्यांनी खालावली आहे. दरम्यान, वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणावर अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो गावांतील लाखो नागरिकांची तहान अवलंबून आहे.
या धरणावरून अकोला जिल्ह्यातील ८४ तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव शहरासह संग्रामपूर, जळगाव जा. या दोन तालुक्यातील १४० गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत १४७ गावे तसेच शेगाव शहराला भूमिगत जलवाहिनीच्या माध्यमातून दररोज शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. मध्य प्रदेशातून उगम असलेल्या वाण नदी सातपुडा पर्वत रांगेतून वाहते.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पाऊस पडल्यास ही नदी वाहती होते. सद्यःस्थितीत मध्य प्रदेशात सातपुड्याच्या पर्वतराजीत मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसला नाही. तर भविष्यात पिण्याच्या पाण्यात कपात करण्याची वेळ येऊ शकते.
पिण्यासाठी वार्षिक ३७.९०७ दलघमी पाणी आरक्षित
हनुमान सागर धरणातून संग्रामपूर, जळगाव जा., शेगाव ही ३ तालुके, तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट शहर व तालुका धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या तालुक्यांना पिण्याच्या पाण्याचे एकूण ३७.९०७ दलघमी वार्षिक पाणी आरक्षित आहे. एकूण पाणी वापर ३७.९०६ दलघमी एवढा आहे. सद्यःस्थितीत धरणात जिवंत पाणी साठा २२.७७ दलघमी एवढा आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण ८१.९५५ दलघमी एवढी, म्हणजे ४१२ मीटर एवढी आहे.