Join us

Dam Water: पुणे, नाशिक, नगर, मराठवाड्यातील महत्वाच्या धरणांमध्ये एवढं पाणी राहिलेय शिल्लक..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 9:13 AM

राज्यातील प्रमुख तीन धरणांत चिंताजनक पाणीसाठा, पिण्यासाठी पाणी राखून ठेवावे लागणार

राज्यातील तीन महत्त्वाच्या धरणांमधील सद्यस्थितीत असलेला उपयुक्त पाणीसाठा निश्चितच पुढील पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंतच्या कालावधीसाठी चिंताजनक असून उर्वरित  पाणीसाठा यासाठी यापुढे पिण्यासाठी आरक्षित करणे गरजेचे असल्याचे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त  इंजि. हरीश्चंद्र चकोर, जलसंपत्तीं अभ्यासक यांनी सांगितले.  

मराठवाड्यासाठी संजीवनी असणाऱ्या जायकवाडी धरणात जानेवारी महिन्याच्या शेवटी सुमारे २९.२२ टीएमसी (३८.११% )इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.  आत्तापर्यंत धरणपाणी साठ्यातून अंदाजे  ४.४० टीएमसी(७.२५%) इतका बाष्पीभवन व्यय  (Evaporation losses) नोंदविण्यात आला आहे.  

उजनीत पाणीसाठा मायनसमध्ये

उजनी धरणामध्ये  एकुण सुमारे ६०.७२टीएमसी व(-)२.९४ टीएमसी)  इतका (-५.४९%)  उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून उपयुक्त पाण्याची पातळी ही खालावली आहे. 

कोयनेत किती टीएमसी?

महाराष्ट्राला हायड्रो इलेक्ट्रीसिटी निर्मितीद्वारे वीज पुरविणाऱ्या कोयना  धरणात एकूण ७२.७५ टीएमसी इतका म्हणजेच (६९.११%) व सुमारे ६७.६३ टीएमसी इतका म्हणजेच( ६७.६१% ) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे .

पुणे विभागातील खडकवासला धरण समूहांत सुमारे १७.७७ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून तो गतवर्षीपेक्षा जवळपास सात (७.००) टीएमसी इतका कमी आहे. 

नाशिकचा पाणीसाठा आता..

नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा हा  गतवर्षीच्या( ७७.२०%) साठ्यापेक्षा सुमारे २० टक्के म्हणजे ५७.०६% इतकाच शिल्लक राहिल्याने यापुढे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे .त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक ठरणार असून त्याचा रब्बी व उन्हाळी सिंचनावर निश्चितपणे परिणाम होऊ शकतो.

पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित करावे लागणार..

पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता (प्रायोरिटी) लक्षात घेता राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठे राज्य शासनाला आरक्षित करावे लागणार आहे आणि यापुढे पाण्याचा वापर देखील काटकसरीने करणे जनतेला क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यादृष्टीने शासनाने आत्ताच  काटकसरीने पाणी वापर अभियान राबवून सतर्कता बाळगली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणांत पाणी टंचाई जाणवणार असल्याचाअंदाज आहे. 

नगरच्या धरणांत किती पाणीसाठा?

यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा , निळवंडे, मुळा धरणांसह बारा(१२) प्रमुख धरणांतील आजपर्यंतचा पाणीसाठा समाधानकारक आहे. मात्र मांडओहोळ, सीना ,खैरी या प्रकल्पांमधील पाणीसाठे मात्र मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यात विशेषतः प्रशासनाला पाणी टंचाईची निश्चितपणे दक्षता घ्यावी लागणार असून पिण्याचे पाणी कमी पडणार नाही यासाठी सतर्क राहावे लागणार आहे.

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग

टॅग्स :धरणपाणीजायकवाडी धरणकोयना धरणपाणीकपात