Join us

Dana Cyclone : बंगालच्या किनाऱ्यावरील चक्रीवादळाला नाव कोणी व कशावरून दिले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 3:52 PM

Dana Cyclone Name Story सध्या बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यावर येण्यापूर्वी जोरदार वारे वाहत असून, पाऊसही पडत आहे.

पुणे : सध्या बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यावर येण्यापूर्वी जोरदार वारे वाहत असून, पाऊसही पडत आहे.

महाराष्ट्राला या वादळाचा काहीही धोका असणार नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. राज्यात पुढचे तीन दिवस बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.

मात्र, शनिवारी (दि. २६) विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

तर रविवारी (दि. २७) विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा विजा आणि ढगांच्या गडगडाटासह यलो अलर्ट दिला आहे.

तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी ओडिशातील समुद्राने उग्र रूप धारण केले असून, ओडिशा सरकारने १० लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर केले आहे.

तसेच बंगालमध्येदेखील हजारो लोकांचे स्थलांतर केले आहे. हे चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर पुरी आणि सागर बेटाच्या जवळ भितारकणिका आणि धमारादरम्यान किनाऱ्यावर गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वादळाला नाव कोणी दिले?चक्रीवादळाला 'दाना' नाव हे यादीत 'कुवेत' राष्ट्राने सुचविलेले अरेबिक भाषेतील नाव आहे. 'मनाचा मोठेपणा' किंवा 'उदारता' किंवा 'औदार्य असा त्याचा मराठीतील अर्थ आहे, अशी माहिती खुळे यांनी दिली.

महाराष्ट्राला ह्या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही. वादळ आदळल्यानंतर त्याची आर्द्रता अवशेष उत्तरेकडे सिक्कीमकडे तर काही अवशेष महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगलीपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे त्या भागात रविवार, २७ ऑक्टोबरला केवळ ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ

टॅग्स :चक्रीवादळहवामानपाऊसमहाराष्ट्रपश्चिम बंगाल