अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातला ठराव राज्य शासनाकडे तत्काळ पाठवला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. तसेच, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.
गुरुवारी (दि.१६) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन समितीची व कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. बैठकीनंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती व सर्व जनतेची मागणी पाहता आजच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. तसा ठराव समितीच्या बैठकीत घेतला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवणार आहे. काही जणांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे, त्यावर सुद्धा सुनावणी होणार आहे. पण नगर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन हा निर्णय घेतला असल्याचेही विखे यांनी यावेळी सांगितले.
या निर्णयामुळे आम्हाला आता आवर्तनामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढ मिळेल व आम्ही अधिक आवर्तन देऊ शकू. त्याचेसुद्धा नियोजन करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही विखे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात शेतीसाठी आवर्तनाचा निर्णय
- सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी एकत्रितपणे आवर्तन सोडण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार गोदावरीतून २ डिसेंबर, मुळा धरणातून १० डिसेंबर, तर प्रवरामधून ११ डिसेंबरला आवर्तन सोडण्यात येणार आहे.
- सध्या निळवंडे धरणातून आवर्तन सुरू आहे. निळवंडेच्या २ आवर्तनातून कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळत नव्हते, त्यामुळे आता १५ डिसेंबरपर्यंत निळवंडे कॅनॉलची चाचणी पूर्ण होईल व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय बैठकीत झाला असल्याचेही पालकमंत्री विखे यांनी सांगितले.
- कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, बबनराव पाचपुते, लहू कानडे, डॉ. किरण लहामटे, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे आदी उपस्थित होते.