रब्बी हंगामातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तनासाठी आज सोमवार दि.१५ रोजी सकाळी सहा वाजता(६.००वा.) निळवंडे धरणातून सुमारे १४०० क्युसेक्स इतका पाणी विसर्ग प्रवरा नदी मध्ये सोडण्यात आलेला आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. प्रवरा डाव्या कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन सोडण्याच्या सूचनाही त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या.
रविवारी (दि. १४) महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विखे-पाटील हे संगमनेरात आले होते. येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील प्रांत कार्यालयात जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. नाशिक जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, मुळा लाभक्षेत्र कार्यकारी अभियंता सायली पाटील, प्रवरा लाभक्षेत्राचे स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता कैलास ठाकरे, कार्यकारी अभियंता कैलास हापसे आदी बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत मुळा, गोदावरी आणि प्रवरा धरण समूहाच्या आवर्तनाचा आढावा घेण्यात आला. तसेच निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत मंत्री विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली. असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. लाभक्षेत्रातील राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचेल, यासाठी दीड टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येईल. प्रवरा धरण समूहातील उपलब्ध पाण्याचा साठा लक्षात घेऊन रब्बी हंगामातील पिकांसाठी सोमवारपासून आवर्तन सोडण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
आजचा धरणांमधील एकूण पाणीसाठा पुढीलप्रमाणे.
१)भंडारदरा-- ६७८४ दलघफुट(६१.४५%) २) निळवंडे --५८५२ दलघफुट (७०.३४%)३) मुळा धरण --२००११ दलघफुट(७६.९७%) डावा कालवा-४०० क्युसेक्स.