Join us

हिंद महासागराच्या तापमानवाढीमुळे होणार विनाशकारी परिणाम, संशोधनात भीती व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 11:58 AM

अणुबॉम्बच्या स्फोटासारखे तापमान रोज जाणवणार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: हिंद महासागरात वर्ष २०२० ते २१०० पर्यंत १.४ ते ३ अंश सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून चक्रीवादळे वाढण्यासह मान्सूनवर परिणाम होईल; तसेच समुद्राची पातळी वाढून विनाशकारी परिणाम होतील, असा इशारा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

अभ्यास कुणाचा?

पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (आयटीएम) हवामानशास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले आहे. अभ्यासानुसार, अणुबॉम्बच्या स्फोटासारखे तापमान दर सेकंदाला, दिवसभर, दररोज जाणवत राहील. 

कायमस्वरूपी राहणार उष्णतेच्या लाटा

उष्णतेच्या लाटा (समुद्राचे तापमान अपेक्षेपेक्षा अधिक राहण्याचा कालावधी) दरवर्षी २० दिवसांनी (१९७० ते २०००) वाढून भविष्यात २२० ते २५० दिवसांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिंद महासागरात २१ शतकाच्या अखेरपर्यंत कायमस्वरूपी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल.

नेमके काय होणार?

समुद्रात 'उष्णतेच्या लाटा' निर्माण झाल्यामुळे प्रवाळाचा रंग बदलला जातो. समुद्री गवत नष्ट होते. याच वेळी जलीय परिसंस्थेचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होते. याचा विपरीत परिणाम मत्स्यव्यवसायावर होत आहे. कमी कालावधीत चक्रीवादळाचा जोर वाढण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे

उष्णतेच्या प्रमाणात भविष्यात होणारी वाढ ही अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेसारखीच असेल (हिरोशिमामधील स्फोटाप्रमाणे), अरबी समुद्रासह उत्तर-पश्चिम हिंद महासागरात सर्वाधिक तापमानवाढ होईल, तर सुमात्रा आणि जावाच्या किनारपट्टीवर कमी तापमानवाढ होईल.- रॉक्सी मॅथ्यू कोल, हवामानशास्त्रज्ञ

२ कि.मी. तळापर्यंत पसरतेय उष्णता

१ उष्णकटिबंधीय हिंद महासागरासाठी भविष्यातील अंदाज' असे शीर्षक असललेल्या या अभ्यासानुसार, हिंद महासागराच्या पाण्याची जलद तापमानवाढ केवळ त्याच्या पृष्ठभागापुरती मर्यादित नाही.

हिंद महासागरात, पृष्ठभागापासून २,००० मीटर खोलीपर्यंत उष्णतेचा प्रवाह सध्या ४.५ झेटा-ज्युल प्रतिदशकाच्या दराने वाढत आहे आणि भविष्यात प्रतिदशक १६- २२ झेटा-ज्युल्सच्या दराने वाढण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :तापमानहवामान