Join us

Dimbe Dam Water Storage: डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले १८,००० क्युसेक्सने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 10:32 AM

डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे डिंभे धरणात जलदगतीने पाणी जमा होत आहे. आज धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे डिंभे धरणात जलदगतीने पाणी जमा होत आहे. आज धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. रात्रीपासून पावसाचा जोर अचानक वाढल्याने धरणात जवळपास २८००० क्युसेक्सने पाणी जमा होत आहे.

त्यामुळे धरणातून २५०० क्युसेक्सने सोडण्यात येत असलेल्या पाण्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली असून आज ४ वाजता धरणाचे पाचवी दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून १८००० क्युसेक्स एवढ्या जलद गतीने घोड नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून अधिक गतीने विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काल संध्याकाळी ४ वाजेपर्यंत धरणात ८७ टक्क्यांवर असणारे धरण रात्रीतून पूर्णता भरले असून सध्या धरणाची पाणी पातळी ७१८.५० एवढी झाली आहे.

मागील २४ तासात धरण पाणलोट क्षेत्रात ५७ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद झाली आहे: मात्र तालुक्याचे धरण क्षेत्र हे दुर्गम भागातील पाटणाचे खोरेपर्यंत जवळपास ७० किलोमीटर आत विस्तारले गेले असल्यामुळे डिंभे धरणावरील पाणी पावसाची नोंद ५७% झाली असली तरी प्रत्यक्षात ही आकडेवारी दुप्पट तिप्पट असू शकते.

काल रात्रभर आणि आज दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे आज चार वाजता डिंभे धरणाचे पाचही दरवाजे खुले करण्यात आले असून सुमारे १८००० क्युसेक्स एवढ्या जलद गतीने घोड नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे घोड नदीपात्र दुथडी भरून वाहत असून नदी व आसपासच्या गावांना पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू राहिल्यास कोणत्याही क्षणी विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानेही पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना संबंधित विभागांना दिल्या असून आपत्कालीन परिस्थितीत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणात दर तासी २८००० क्युसेक्सने पाणी जमा होत आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीतून अधिक पाणी सोडावे लागणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. - अक्षय सुरवसे, उपअभियंता, डिंभे धरण

टॅग्स :धरणपाणीपाऊसपुणेहवामाननदी