Join us

दौंडमधून साडेपाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 9:52 AM

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात बुधवारी सायंकाळपासून वाढ झाली असून दौंड येथून २ हजार १७१ क्युसेक होता. त्यात गुरुवारी सकाळी वाढ होऊन ४ हजार ५१९ क्युसेक इतका वाढला.

टेंभुर्णी : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात बुधवारी सायंकाळपासून वाढ झाली असून दौंड येथून २ हजार १७१ क्युसेक होता. त्यात गुरुवारी सकाळी वाढ होऊन ४ हजार ५१९ क्युसेक इतका वाढला. सायंकाळी ६ वाजता पुन्हा पाणीपातळीत वाढ होऊन ५ हजार ४१० क्युसेक इतका विसर्ग सुरू होता.

गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने दौंड येथील विसर्गात गेल्या दोन दिवसांत वाढ होत गेली आहे. यामुळे उजनी जलाशयाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ४ जूनपासून उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली होती.

५ जूनपासून उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती. तर ९ जूनपासून दौंड विसर्ग उजनी धरणात मिसळण्यास सुरुवात झाली होती. गेल्या एक महिन्यापासून उजनी धरणात २० टक्के पाणी पातळी वाढली आहे.

यावर्षी धरणाची पाणीपातळी खूप खालावली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता उजनी धरणाची पाणी पातळी वजा ४० टक्के झाली होती. तर ४२.०९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गतवर्षी ५ जुलै २०२३ रोजी वजा ३५.८५ टक्के पाणी पातळी होती. तर ४४.४५ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीचा तुलनेत यंदा २ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी १ ऑगस्ट २०२३ रोजी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर आले होते. यंदा मृत साठ्यातून उजनी कधी बाहेर येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले.

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीसोलापूरपाऊसदौंडशेतकरी