Join us

गंगापूरचा विसर्ग १,१०६ क्यूसेक; गोदावरीची पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 9:36 AM

रविवारी (दि. १७) पहाटेपासून त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यात पावसाच्या सरींनी जोर धरला होता. यामुळे पाणलोट क्षेत्रातून गंगापूर, वाघाड धरणांत पूरपाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला.

नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याप्रमाणे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र, शनिवार पावसाने पुन्हा निराशा केली होती. रविवारी (दि. १७) पहाटेपासून त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यात पावसाच्या सरींनी जोर धरला होता. यामुळे पाणलोट क्षेत्रातून गंगापूर, वाघाड धरणांत पूरपाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला.शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.२ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. शहरात शनिवारप्रमाणेच रविवारीही दुपारनंतर ढगाळ हवामान दिवसभर कायम राहिले. दुपारी व संध्याकाळी मध्यम सरींचा काही मिनिटांपुरता वर्षाव झाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले, अचानकपणे आलेल्या पावसाने विक्रेत्यांचीही धावपळ उडाली.

कुलाबा येथील वेधशाळेने नाशिक जिल्ह्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट दिला होता, तर रविवारी 'यलो अलर्ट होता. यामुळे काही ठरावीक भागात घाट प्रदेशामध्ये पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर, दिंडोरी भागांत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने, गंगापूर, वाघाड धरणात पूरपाण्याची आवक होत आहे. यामुळे गंगापूरचा विसर्ग संध्याकाळी सात वाजता पुन्हा ५६९ क्युसेकने वाढवून तो १,१०६ क्युसेक इतका करण्यात आला.

रविवारी पहाटे सहा वाजेपर्यंत झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)आंबोली  ३४काश्यपी  १५गंगापूर  १०त्र्यंबक  १०गौतमी  १०

..तर वाढ शक्यआता गंगापूर धरणाचा साठा ९७ टक्क्यांवरून ९५.९५ टक्क्यांवर आला आहे. शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून ५३७ क्युसेक इतका विसर्ग गंगापूरमधून गोदावरी पात्रात सोडण्यात आला. तो २३ तासांनी पुन्हा ५६९ क्युसेकने वाढविण्यात आला, तसेच वाघाड धरणातूनही संध्याकाळी सहा वाजता २०६ क्युसेक इतका विसर्ग कोळवण नदीत सोडण्यात आला. यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत रविवारी दिवसभर वाढ झालेली दिसून आली. मध्यरात्रीनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी किंवा अधिक झाल्यास, त्यानुसार विसर्गात पुन्हा फरक पडू शकतो, असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. रामकुंडापासून पुढील सांडव्यावरून पाणी वेगाने वाहत होते.

टॅग्स :धरणनाशिकपाऊसगंगापूर धरणपाणी