जायकवाडी धरणासाठीनाशिक जिल्ह्यातील दारणा धरणामधून अखेरीस शुक्रवारी मध्यरात्री पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर आजपासून गंगापूर, मुकणे आणि कडवा या धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे. जायकवाडी धरणासाठी अहमदनगर, नाशिकमधील दारणा तसेच गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश ३० ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. नाशिक आणि अहमदनगरमधून शेतकरी तसेच लाेकप्रतिनिधींचा विरोध होत होता. तसेच न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री दारणा धरणातून २०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. आता आजपासून दि. २६ नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि कडवा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि.२४) रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार मध्यरात्री २०० क्युसेक वेगाने इतके पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर हळूहळू पुढील विसर्ग करण्यात येणार आहे. दारणा धरण समूहातून २.६४३ टीएमसी आणि गंगापूर धरणातून ०.५ म्हणजे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश आहेत.
दारणा पाठोपाठ रविवारी गंगापूर, मुकणे आणि कडवा या तीन धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदाविभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी तसे स्पष्ट केले आहे. मात्र या संदर्भात नाशिक महापालिकेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. रविवारी गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतर गोदाकाठचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गंगापूर आणि मुकणे धरणातून नाशिक शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
गंगापूर कडवा, मुकणे जलाशयातून रविवारी (दि. २६) सकाळी प्रथम पाचशे क्युसेस विसर्ग करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रातील आणि लगतही वस्तू, साहित्य, मोटारी, वाहने नदीपात्राबाहेर काढून घ्यावेत तसेच नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये. नदीपात्राजवळील धार्मिकस्थळी, पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करू नये. - सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने यासंदर्भात चार आठवड्यांपूर्वी आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथून राजकीय विरोध सुरू झाला होता तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र, महामंडळाच्या आदेशाला स्थगिती मिळाली नाही. नाशिक जिल्ह्यात यंदा जेमतेम ६० टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. शेतीला योग्य वेळी पाणी मिळाले नाही तर शेती उद्ध्वस्त होईल अशी भीती आहे. त्यातच पाणीटंचाई असताना नाशिक आणि नगरमधून ९ टीएमसी पाणी सोडल्यास जायकवाडीपर्यंत ६ टीएमसी पाणी पोहोचणार असून ३ टीएमसी लॉसेस आहेत त्यामुळे नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्यास विरोध होत होता.
दारणाकाठी वीजपुरवठा बंद
- नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पाणीचोरी होऊ नये यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
- तसेच जलसंपदा विभागाचे पथकदेखील निगराणी करीत होते, असे सांगण्यात आले. पाणी रोखणे किंवा तत्सम राजकीय आंदोलने होऊ नये यासाठी पोलिसही दक्षता होते.
सुनावणीच्या आतच सोडले पाणी
- नाशिक आणि अहमदनगर येथील बहुतांश विरोध करणाऱ्या राजकीय नेते, कारखानदारांच्या याचिकांवर उच्च न्यायालयात ५ डिसेंबरला सुनावणी आहे. त्यापूर्वी २१ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी पाणी सोडण्यास स्थगिती मिळाली नव्हती.
- मराठवाड्यातील राजकीय नेत्यांचा वाढता दबाव लक्षात घेता हे पाणी सोडल्याचा नाशिकमधील राजकीय नेत्यांचा आरोप आहे. दुसरीकडे मात्र, नाशिककचा राजकीय दबाव कमी पडल्याचीही चर्चा होत आहे.