राज्यात पावसाअभावी पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त असलेल्या महसूल मंडळांची संख्या आता ३००वर पोचली असून, १५ ते २१ दिवस खंड असलेल्या एकूण महसूल मंडळांची संख्या पाचशेच्या घरात गेली आहे. यावरून उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून, आगामी दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यातच येत्या पंधरवड्यातसुद्धा समाधानकारक पाऊस नसल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंतेत भर पडली आहे.
उत्पादनात किमान ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे कपाशी व सोयाबीनवर कीड रोगांचाही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
केंद्राकडे मदतीची मागणी राज्यातील दुष्काळी भागांसाठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपाययोजना आणि त्यासाठी लागणारी आर्थिक मदत केंद्र शासनाने करावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना भेटून आज राज्याचे मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केली.
कमी पावसामुळे वाढली चिंताजुलैपर्यंत सुरळीत असलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये चांगलीच ओढ दिली आहे. या महिन्यात सरासरीच्या केवळ ३१ टक्केच पाऊस झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. राज्यातील २९७ महसुली मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे संकट राज्यावर घोंघावू लागले आहे. शेतकऱ्यांची पिके करपू लागली असून, वरुणराजाची कृपा न झाल्यास पिकांचे नुकसान आणि कर्ज परतफेड अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
कृषी विभागाने १ जून २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीबाबतचा पीक पाहणी अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ७५९.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पिके फुलोऱ्याला आली, पण पावसाचा पत्ताच नाहीसोयाबीन, मका ही पिके आता फुलोन्याच्या अवस्थेत असल्याने पावसाची मोठी गरज निर्माण झाली आहे. राज्यात आज जरी पाऊस आला तरी सोयाबीन व मक्याच्या उत्पादनात किमान ३० टक्के घट होण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन आठवडे पाऊस न आल्यास उत्पादनात ६० ते ७० टक्के घट होण्याची भीती कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सरकार हे करणार का?■ धरणांमध्ये पाणी साठा कमी आहे. त्याचा आढावा घेऊन उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्याचे नियोजन करणार का?■ पुढील काही दिवस पाऊस ओढ देणार आहे. आता परतीच्या पावसावरच मदार दिसते आहे. दरम्यानच्या काळात कृत्रिम पावसाबाबत निर्णय घेणार का?■ खरिपाची पिके धोक्यात आली आहेत, काही ठिकाणी करपली आहेत, त्या शेतकयांसाठी काय केले जाणार?
तर मिळणार २५ टक्के विमा भरपाईपावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड असलेल्या राज्यातील ५३ मंडळांमध्ये सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे काम सुरु झाले आहे. आता नव्याने त्यात वाढ झाली आहे. या अहवालानंतर जिल्हाधिकारी अधिसूचना जारी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याच्या भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम मिळू शकेल. - दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण
गेल्या वर्षी उत्पादन चांगले मिळाले. मात्र, बाजारभाव मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत आला. यंदाचे वर्ष दुष्काळाचे आहेच असे दिसतेय.- गजानन जाधव, कृषितज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर
मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे उपाययोजना, पशुधनाला सकस चारा मिळावा यासाठी कडूळ, मका पेरणीचे निर्देश, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना टँकरच्या निविदा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांत तत्काळ पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. धनंजय मुंडे, कृषी मंत्री