ब्रिटिशकालीन भाटघर धरणात ३३ टक्के, तर निरादेवघर धरणात ३५.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. भाटघर धरणातून १९८७ क्यूसेकने तर निरादेवघर धरणातून ७५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. सध्या दोन्ही धरणांतून २७४० क्युसेकने पाण्याचा विर्संग सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
गतवर्षी भाटघर धरण ३४ टीएमसी तर निरादेवघर धरण ११.९१ टीएमसी पाणीसाठा असलेली दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मागील वर्षी भाटघरमध्ये ४२ टक्के तर निरादेवधर धरणात ५५.३५ टक्के पाणीसाठा होता.
त्यामुळे यावेळी भाटघर धरणात १० टक्के, तर निरादेवघर धराणात १७ टक्के पाणीसाठा कमी आहे. वीर धरणात सध्या ४५.४० टक्के तर गुंजवणी धरणात ४४.२३ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी वीर धरणात ६३.८८ टक्के तर गुंजवणी धरणात ६०.२७ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणांत १८ टक्के पाणीसाठा कमी आहे.
भोर, वेल्हे तालुक्यातील भाटघर निरादेवघर गुंजवणी धरणात दर वर्षी पावसाळ्यात ४० टीएमसी पाणीसाठा होतो. मात्र, उन्हाळ्यात धरणे रिकामी होतात आणी दरवर्षी भोर वेल्हे तालुक्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.
यामुळे टाकी भोरला आणी नळ पूर्व भागाला अशी अवस्था आहे. भोर तालुक्यात कालवा समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याचे योग्य निर्णय घेतले जात नसल्यामुळे ही अवस्था असून पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पाणीटंचाईची शक्यता
वीर धरणातून निरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेकने तर निरा उजव्या कालव्यातून १५५० क्युसेकने पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. दोन्ही कालव्यांतून पुरंदर, फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या पूर्वीकडील तालुक्यांना पाणी सोडण्यात येत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणांत २० टक्के पाणीसाठा कमी असून सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो असाच कायम राहिल्यास पुढील अडीच महिन्यांत धरणे रिकामी होऊन भोर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकेल.