केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (एमओईएस) वर्ष २०२० मध्ये ‘भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन’ हा अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडावर झालेल्या हवामान बदलाच्या परिणामाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले आहे.
या अहवालातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- वर्ष १९०१ ते २०१८ या कालावधीत भारताचे सरासरी तापमान सुमारे ०.७ अंश सेल्सियसने वाढले आहे.
- वर्ष १९५० ते २०१५ हा कालावधीत दैनंदिन पर्जन्यमान अतिप्रमाणात (पर्जन्यमानाची तीव्रता प्रतिदिन दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक )होण्याची वारंवारता सुमारे ७५%नी वाढली.
- वर्ष १९५१ ते २०१५ या काळात दुष्काळ पडण्याची वारंवारता आणि दुष्काळाची क्षेत्रीय व्याप्ती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
- वर्ष १९९३ ते वर्ष २०१७ या अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी दर वर्षी ३.३ मिलिमीटर या वेगाने वाढत आहे.
- वर्ष १९९८ ते २०१८ या काळात पावसाळ्यानंतर अरबी समुद्रात भयंकर चक्रीवादळ येण्याचे प्रमाण वाढले आहे.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) भारतीय भूप्रदेशातील हवामानावर नियमितपणे लक्ष ठेवून असते आणि हाती आलेल्या निरीक्षणावरून “वार्षिक हवामानविषयक सारांश’ या वार्षिक हवामानाचे प्रकाशन करते. आयएमडी मासिक हवामानविषयक सारांश अहवाल देखील जारी करत असते. वार्षिक हवामानविषयक सारांशामध्ये संदर्भित कालावधीतील तापमान, पाऊस, अतितीव्र हवामानविषयक घडामोडी यांच्या विषयीच्या माहितीचा समावेश असतो.