सांगली : मान्सूनने जिल्ह्यात दमदार सुरुवात केली असून, शनिवारी मध्यरात्री मिरज, तासगाव तालुका तसेच शिराळा पश्चिम भागास मुसळधार पावसाने झोडपले. जत, कवठेमहांकाळ भागातही हलक्या सरींनी हजेरी लावली, येरळा व अग्रणी नद्यांना पूर आल्याने तासगाव तालुक्यात नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले.
त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. मिरज तालुक्यातही अनेक ओढे, नाल्यांना पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरण परिसरातही चोवीस तासांत ६० मि.मी. पावसाची नोंद झाली. सांगली व मिरज शहराला शनिवारी मध्यरात्री पावसाने झोडपले.
शहराच्या सखल भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. चौक, रस्तेही जलमय झाले. रविवारी दिवसभर ढगांची दाटी कायम होती.
चांदोली धरण परिसरामध्ये ६० मिलीमीटर पावसाची नोंदशिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसरात मागील दोन दिवस सलग पाऊस कोसळत होता. पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने परिसरात गारठा निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासात चांदोली धरण परिसरात ६० मिलीमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे.
धरणक्षेत्रात रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ६० मिलीमीटर तर आजअखेर एकूण ९४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील मणदूर, सोनवडे, आरळा, करंगली, मराठेवाडी, काळुंदे, पणूछे वारुणसह वाड्या-वस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील ओडे नाले भरून वाहत आहेत.
पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. चांदोली धरणात १०.३८ टीएमसी (३०.१६ टक्के) एकूण पाणीसाठा तर उपयुक्त ३.५ टीएमसी (१२.७० टक्के) आहे. रविवारी दुपारनंतर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. दमदार पावसाने परिसरातील भात पेरण्या आठवडाभर पुढे गेल्या आहेत.