गेल्या काही दिवसांपासून सतत तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे अनेकांना थकवा आणि उष्माघाताचा त्रास जाणवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपचाराची सोय झाली आहे.
सध्या राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाचे प्रमाण वाढले तर शरीरातून घाम बाहेर पडून शरीराचे तापमान स्थिर होत असते. मात्र, उष्णतेच्या झळा वाढल्यानंतर शरीरातील रक्ताभिसरण क्रियेवर त्याचा दुष्परिणाम होतो.
चयापचय क्रिया सामान्य ठेवण्यासाठी शरीराचे तापमान नेहमी ३६ आणि ३७ अंश सेल्सिअंश दरम्यान ठेवणे आवश्यक आहे. तापमान नियंत्रणात राहिले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतात. कमी रक्तदाबाचा त्रास सुरु होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
उष्माघाताचा त्रास होत असल्यास त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. एप्रिल व मे असे दोन महिने उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याने या काळात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
यामुळे होतो उष्माघात?■ तीव्र उन्हात शारीरिक कष्टाची कामे बराच वेळ करणे.■ जास्त तापमानाच्या खोलीमध्ये खूप वेळ काम करणे.■ जीन्ससारख्या घट्ट कपड्यांचा नियमित वापर करणे.■ कोणतीही काळजी न घेता उन्हात जास्त वेळ फिरणे.
ही आहेत लक्षणेमळमळ होणे, उलटी, हात-पायाला गोळे येणे, थकवा येणे, ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, बराच वेळ अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे, खूप वेळ निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, घबराट अशी उष्माघाताची लक्षणे आहेत.
हे आहेत प्राथमिक उपचारउन्हाचा तीव्र धक्का बसताच रुग्णास प्रथम सावलीत आणावे. त्याचे कपडे सैल करावेत. त्याला द्रव पदार्थ किवा कैरीचे पन्हे द्यावे, तापमान कमी होण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्यात. खोलीतील पंखे, कूलर चालू करून हवा खेळती ठेवावी. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी द्यावे. त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.
यांनी घ्यावी विशेष काळजीसतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती. दहा वर्षे वयापेक्षा कमी वयाची बालके, खेळाडू, हृदयरोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार असलेले.
काय घ्यावी खबरदारी■ फळे व सलाडसारखे पचायला हलके पदार्थ खावेत.■ ताक, लिंबूपाणी, लस्सी, ओआरएस असे द्रावण घ्यावे.■ भरपूर पाणी प्यावे.■ सैल, हलके, फिक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावे.■ गॉगल, छत्री, टोपी, बूट, चप्पल घालूनच बाहेर पडावे.■ दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे.■ प्रवास करताना पाण्याची बाटली जवळ बाळगावी.