बाळासाहेब बोचरेमुंबई : राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील १३८ मोठ्या धरणांतील सरासरी पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. २६० मध्यम प्रकल्प ७१ टक्के भरले असून, २५९९ लघु प्रकल्पांत ४७ टक्के साठा झाला आहे.
आजच्या घडीला विविध प्रकल्पांत मिळून ४०८१३.९७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. १३८ मोठ्या धरणांपैकी ४० धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर ४५ धरणांमध्ये ९० टक्क्यांच्या वर साठा आहे. ३५ धरणे ७० टक्क्यांच्या वर भरली आहेत. ९० टक्क्यांच्या वर भरलेल्या धरणांतून विसर्ग सुरू आहे.
राज्यातील १३८ मोठ्या प्रकल्पांची साठवण क्षमता ३५५४३.२९ द.ल.घ.मी असून सध्या ३२८३९.२९ द.ल.घ.मी. इतका साठा आहे. एकूण उपयुक्त साठवण क्षमता २९०६६.९९ द.ल.घ.मी. आहे. सर्व प्रकल्पांत मिळून २६३१८ द.ल.घ.मी. इतका उपयुक्त साठा आहे.
मध्यम प्रकल्पात ७१ टक्के पाणी राज्यात २६० मध्यम प्रकल्प असून, त्यांची साठवण क्षमता ६१८२.४४ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ४५८४.९७ दलघमी म्हणजे ७१ टक्के साठा आहे. २,५९९ लघु प्रकल्प असून, यामध्ये ४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. लघु प्रकल्पांची साठवण क्षमता ६५२९ दलघमी आहे.
विभाग | धरणे | एकूण साठा | टक्के |
नागपूर | १६ | ३७०२.६९ | ८२.६७ |
अमरावती | १० | २६७४.७६ | ८८.१९ |
छ. संभाजीनगर | ४४ | ४७७४.७४ | ७४.१० |
नाशिक | २२ | ३९२१.७८ | ९०.९२ |
पुणे | ३५ | १५१५६.१३ | ९७.१३ |
कोकण | ११ | २६०९.४३ | ९६.७४ |
विभाग | प्रकल्प | पाणीसाठा | टक्के |
नागपूर | ३८३ | ४७५४ | ८१.८७ |
अमरावती | २६४ | ३९३६.०४ | ८३.५७ |
छ. संभाजीनगर | ९२० | ६२३४.५१ | ६०.३८ |
नाशिक | ५३७ | ५३४७.६१ | ७६.३४ |
पुणे | ७२० | १६९१८.०३ | ९०.४४ |
कोकण | १७३ | ३६२३.०५ | ९३.२३ |
मराठवाड्याची चिंता दूरऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकसह मराठवाड्यात झालेल्या समाधानकारक पावसाने मराठवाड्यातील धरणे भरून वाहू लागली आहेत. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे जायकवाडी ९० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्याची चिंता दूर झाली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील पावसाचा जोर असरला असला तरी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता कायम आहे.