Join us

उत्तरेकडे सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातही थंडीत वाढ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 1:23 PM

लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडणारे धुके व हिमवर्षावाबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार, ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा प्रभाव कायम आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, हवामान खात्याने उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी तीव्र थंडीचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये काल किमान तापमान ७ ते १० अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले.

उत्तर भारत आणि मध्य भारतातील ८ राज्यांमध्ये सकाळची सुरुवात धुक्याने झाली. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड आणि ओडिशामध्ये धुक्यामुळे दृश्यमानतेवरही परिणाम झाला. कालदेखील या राज्यांमध्ये दाट धुके होते. दिल्लीतील अनेक गाड्या दाट धुक्यांमुळे आपल्या नियोजित वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत.

याशिवाय पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि उत्तर प्रदेशच्या काही शहरांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात थंड वारे वाहत आहेत. सोमवारी सकाळपासून लखनौ आणि वाराणसीमध्ये धुके आहे. येथे दृश्यमानता २०० मीटरपर्यंत पोहोचली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील २१ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. काल हरयाणा आणि पंजाबला दाट धुक्याने वेढले.

उत्तरेकडे सुरू असलेल्या पाऊस आणि हिमवर्षावामुळे राज्यातही थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडणारे धुके व हिमवर्षावाबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार, ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच १ फेब्रुवारीपर्यंत जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री सेल्सिअस ग्रेड म्हणजे सरासरीइतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने, तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व छत्रपती संभाजीनगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक तसेच दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री सेल्सिअस ग्रेड (म्हणजे सरासरीइतके) दरम्यानचे असू शकते, असा अंदाज आहे.

टॅग्स :हवामानमहाराष्ट्रतापमानविदर्भपाऊसबर्फवृष्टीजम्मू-काश्मीरहिमाचल प्रदेश