अति पाऊस झाल्यानंतर त्याच्या पुढील वर्षभरात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीचे सौम्य भूकंप देशभरात अनेक ठिकाणी जाणवतात, ती एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
३ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास नांदेड शहरातील अनेक भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. या भूकंपाची तीव्रता १.५ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असून, केंद्रबिंदू उत्तरेकडे ८ ते १० कि.मी. अंतरावर असल्याची नोंद एसआरटीच्या प्रयोगशाळेने घेतली आहे. यापूर्वीही नांदेड शहरात भूकंपाचे धक्के अनेक वेळा नागरिकांनी अनुभवले आहेत. त्यामुळे नेमके नांदेड शहरातच भूकंपाचे धक्के जाणवतात? या धक्क्यांमुळे कोणता धोका आहे का? भूगर्भात काही वेगळे बदल होत आहेत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूभौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. टी. विजयकुमार यांच्याशी संवाद साधला.
अतिवृष्टीनंतर अशा प्रकारचे सौम्य धक्के जाणवत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. भूगर्भात होणाऱ्या क्रियांमध्ये ताण निर्माण होऊन तो कुठे तरी बाहेर पडतो. अशा भूकंपांना 'स्वार्म अॅक्टिव्हिटी' असे म्हणतात. यात मोठ्या तीव्रतेचे भूकंप नसतात, असे डॉ. टी. विजयकुमार यांनी सांगितले. दरम्यान, १३ वर्षापूर्वी ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप सर्वात मोठा होता.
२०१० मध्ये साडेतीनशे भूकंपांची नोंद
- नांदेड शहराच्या हद्दीत २०१०-११ मध्ये भूकंपांची नोंद घेण्यात आली आहे. या वर्षात झालेल्या भूकंपांमध्ये ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप सर्वांत मोठा होता, तर २००७-०८ मधील वर्षभरात अशा छोट्या १२५ भूकंपांची नोंद घेण्यात आली.
- या दोन्ही वर्षाच्या पावसाळी हंगामात २ अतिवृष्टी झाली होती. मागील वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीनंतर असे भूकंपाचे धक्के जाणवतात, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे, असे प्रो. डॉ. टी. विजयकुमार यांनी सांगितले.मेकॅनिकल ट्रेसमुळे सौम्य धक्के
- भूगर्भात निर्माण होत असलेल्या मेकॅनिकल ट्रेस लोड तयार होतो. हा ट्रेस विक झोनमधून बाहेर पडतो. देशभरात अनेक ठिकाणी भूगर्भात अशा हालचालींची नोंद होते.नांदेडमध्ये यापूर्वी ३.१ रिश्टर स्केल नोंद झाली होती, ज्याची तीव्रता सर्वाधिक होती. रविवारी जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता १.०५ एवढी नोंद झाली. हा सौम्य धक्का होता.