Join us

पूर्व विदर्भ- मराठवाड्यात वादळी पावसासह गारपीटीचा अलर्ट, आज दुपारपासून...

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 24, 2024 4:20 PM

उत्तरेत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानाचा पारा आज घसरला आहे

पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागाने वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतात उत्तरेकडील राज्यांमध्ये असणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात मराठवाडा विदर्भात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तरेत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानाचा पारा आज घसरला आहे. दिवसभर उन्हाचा कडाका तर संध्याकाळी गारठा वाढतो आहे.

संबंधित वृत्त-राज्यात किमान व कमाल तापमानाचा पारा घसरला, उद्यापासून...

रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

मराठवाड्याचा हवामान अंदाज :-  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार,

दिनांक  २५ फेब्रुवारी २०२४: रोजी हिंगोली व नांदेड  जिल्ह्यात

दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ : रोजी हिंगोली,नांदेड व परभणी जिल्ह्यात

दिनांक  २७ फेब्रुवारी २०२४ : रोजी हिंगोली  जिल्ह्यात

तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

टॅग्स :पाऊसगारपीटमराठवाडाविदर्भ