Crop Damage : 'यंदा चांगली मेहनत घेऊन पीक उभं केलं होतं, पण मागचा पाणी झाला नाही, त्यामुळं उत्पन्न कमी व्हनार हे माहीत व्हतं, पण आता परत पाण्यानचं खोळंबा केला, आता सगळं हिरावलं' अशी प्रतिक्रिया नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील भात शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याने दिली.
नाशिकजिल्ह्यात काल सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. द्राक्ष पिकांसह कांदा, भात पिकांना मोठा फटका बसला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील भात शेतीला मोठा फटका बसला असून एकीकडे यंदा उत्पादन कमी निघण्याची शक्यता असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने होत्याचं नव्हतं झालं आहे. जे पीक येणारे होत ते देखील हिरावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.
गारपीटीमुळे कोट्यवधींचे नुकसान; निफाड तालुक्याला सर्वाधिक तडाखा
यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वडपाडा येथील शेतकरी कोंडाजी देवराम खोडे यांनी 2 एकर शेती असून एक एकर त्यांनी इंद्रायणी भात पेरले होते. दरवर्षी त्यांना 30 ते 35 पोते भात होत होते. मात्र यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता होती. असे असताना देखील त्यांनी शेवटपर्यंत मेहनत घेतली. मात्र ऐन काढणी सुरू असताना अवकाळी पावसाने तडाखा दिला. आणि सुमारे 70 टक्क्यांहून अधिक भाताचे नुकसान होण्याची भीती शेतकरी खोडे यांनी व्यक्त केली. खोडे म्हणाले, 'औंदा लय मेहनत घेतली व्हती, पाणी कमी झाला तरी पाणी भरून पीक उभं केलं होतं, पण अवकाळी पावसाने सगळ्या मेहनतीवर पाणी फेरल', आज या भाताला चांगला भाव मिळणार व्हता, पण आता पावसात भिजल्याने त्याला निम्मा सुद्धा भाव मिळणार नाही,' आता काय करायचं, असा सवाल खोडे यांनी उपस्थित करत पाण्यात निपचित पडलेल्या भाताच्या पेंढ्या गोळा करण्यात व्यस्त झाले.
येथून जवळच असलेल्या ओझरखेड येथील शेतकरी देवनाथ दिवे यांनी देखील एक एकर क्षेत्रात भाताची लागवड केली होती. गेल्या दोन दिवसांपासून भाताची कापणी सुरू होती. हे सगळं काम सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे त्यांना भात सुरक्षित साठवता आले नाही आणि सर्व भात पीक पाण्यात भिजले. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी दिवे यांनी सांगितले. 'शेतं पाण्याखाली असून ऐन काढणीला आलेल्या भात पिकाचे होत्याचं नव्हतं झालं आहे. 'जे पेरलं ते सगळं गेलं' अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली.