Join us

एप्रिलमध्ये तिन्ही ऋतूंचा अनुभव; दिवसा ऊन, रात्री बोचरी थंडी अन् पावसाचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:14 AM

नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजार बळावले, शेती पिकांचेही झाले नुकसान

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कडक उन्हाच्या झळा अपेक्षित असताना वातावरणात एकदम झालेल्या बदलामुळे तिन्ही ऋतूंचे त्रिसूत्री मिलन दिसून येत आहे. दुपारी उन्हाचा कडाका, रात्री बोचरी थंडी तसेच पावसाचा मारा यामुळे साथीचे आजार बळावत असून रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांऐवजी सर्दी, खोकला या आजारांचे रुग्णच अधिक दिसून येत आहेत.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागडसह परिसरात एप्रिल महिना सुरू झाला तरी अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नसून, वारंवार वातावरणात होणाऱ्या बदलामुळे साथीचे आजारही बळावले आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा हा चाळिशी पार असताना उष्णतेची लाहीलाही जनतेने अनुभवली.

त्यातच रात्री गुलाबी बोचरी थंडी होत नाही, तोच विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसत असल्याने जनतेला या पंधरवड्यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे तिन्ही ऋतू एकाचवेळी अनुभवायला येत आहेत. अंबड तालुक्यातील शहागडसह परिसरात उष्णतेची लाट येऊन चार पाच दिवस जात नाहीत तोच अवकाळीने कहर करून शेतकऱ्यांच्या रब्बीतील पिकांचा तोंडी आलेला घास हिरावला. ९, १०, ११ व १२ एप्रिल रोजी तालुक्यात वादळवाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झाल्याने ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान केले.

तालुक्यात काही परिसरात गुढीपाडव्याच्या दिवशी पावसाने कहर केला. १२ एप्रिल रोजीही तालुक्यातील अनेक गावांत या पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अवकाळीची भीती कायम आहे. ऊन, पाऊस व रात्री थंडी असे काहीसे वातावरण सध्या असून त्याचा लहान मुले, वयस्क मंडळी यांच्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

निसर्ग शेतकऱ्यांची किती परीक्षा पाहणार !

अवकाळीच्या फटक्याने तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसामुळे गहू व ज्वारी पिकांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. निसर्ग शेतकऱ्यांची अजून किती परीक्षा पाहणार आहे, असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

टॅग्स :हवामानशेतकरीशेतीपाऊसउष्माघात