पुणे : आज राज्यातील विविध ठिकाणी रिमझिम पाऊस पडत असून पिकांवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. या पावसामध्ये वारे, वादळ, गारपीट नसल्यामुळे पिकांचे नुकसान तुलनेने जास्त होणार नाही. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या पावसाने हजेरी लावली आहे. केवळ दोन दिवसांसाठी हा पाऊस असून या पावसाचा जास्त फायदाही नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
दरम्यान, या पावसाची तीव्रता कमी असल्यामुळे उभे पिके पडण्याची शक्यता कमी आहे. पण अवघ्या महाराष्ट्रभरात आभाळ दाटून आल्याने वातावरणात बदल होऊन फळे, पालेभाज्या आणि गहू, हरभरा, ज्वारी आणि मक्यासारख्या पिकांवरही परिणाम होणार आहेत. या पिकांवर किडी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. सध्या हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेत, गहू ओंब्या भरण्याच्या अवस्थेत, ज्वारी पोटऱ्याच्या अवस्थेत असल्यामुळे यावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बदलत्या हवामानामुळे आणि अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
काय होणार परिणाम?
या अवेळी पडलेल्या पावसामुळे दोन दिवसांत धुके पडू शकते. तर दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिके, डाळिंब बागा यामध्ये किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा प्रकाश संश्लेषन न झाल्यामुळे पीके कोमजून जाऊ शकतात. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर फवारणी करावी लागेल. तर थंडी वाढल्यानंतर पिकांना फायदा होणार असल्याचं मत जेष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं.
फळबागांना फटका
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर परिसरातील द्राक्ष बागांची काढणी सुरू आहे. काढणीला आलेल्या द्राक्षबागांना पावसामुळे फटका बसणार असून यामुळे मणी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर धुके पडले तर द्राक्षांचे मोठे नुकसान होईल.
हा पाऊस पिकांसाठी फायद्याचाही नाही आणि तोट्याचाही नाही. ढगाळ वातावरण फक्त दोन दिवस असल्यामुळे जास्त परिणाम पिकांवर होणार नाहीत. किडीचा प्रादुर्भाव झाला तर शेतकऱ्यांना फवारणी करावी लागेल. तर ११ जानेवारीपासून वातावरण कोरडे होऊन थंडी वाढण्यास सुरूवात होईल. या थंडीचा पिकांना फायदाच होईल.
- माणिकराव खुळे, जेष्ठ हवामानतज्ज्ञ (निवृत्त), IMD