Join us

शेतकरी, नागरिकांनी दक्षता घ्यावी : वाऱ्यासह पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:41 AM

या भागात यलो अलर्ट जारी, वाऱ्यासह पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात १० ते १२ एप्रिल या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व ताशी ३०-४० कि.मी.प्र.ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. १३ एप्रिल रोजी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी, नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकलपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये.

हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर रहावे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. सर्व नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमराठवाडा