Join us

'यलो अलर्ट'ने दिली हुलकावणी पावसाअभावी शेतकऱ्यांना धडकी

By बिभिषण बागल | Published: July 23, 2023 6:54 PM

मागील तीन-चार दिवसांपासून कोकण, विदर्भ या भागात पाऊस पडत असला तरीवर्षाछायेच्या प्रदेशात मात्र पाऊस नाही. १८ ते २० या तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज विविध हवामान अभ्यासकांनी आणि वेधशाळांनी व्यक्त केला होता.

नाशिक : तीन दिवस मुसळधार पडेल म्हणून जिल्ह्यात यलो अलर्टही देण्यात आला होता, मात्र तीनही दिवस जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. हवामानतज्ञांनी रविवारीही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जर आजही पाऊस आला नाही तर पुढील पाच दिवस पाऊस नसेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

घाटमाथ्यावर असलेला पाऊस अद्यापही खाली उतरण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून कोकण, विदर्भ या भागात पाऊस पडत असला तरीवर्षाछायेच्या प्रदेशात मात्र पाऊस नाही. १८ ते २० या तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज विविध हवामान अभ्यासकांनी आणि वेधशाळांनी व्यक्त केला होता.

या अंदाजानुसार जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र मालेगाव तालुक्याचा काही भाग वगळता जिल्ह्यात कुठेही पावसाने हजेरी लावली नाही. काही ठिकाणी तुरळक सरींचा वर्षाव झाला.

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी जिल्ह्यात आदिवासी भाग वगळता इतर भागात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

अनेकांनी पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली आहे. जिल्ह्यात पाऊस पडणारच नाही असे नाही, पाऊस आहे पण सध्या तसे वातावरण तयार होत नसल्याने पाऊस घाटमाथ्यावरच अडकला आहे.

केवळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील वर्षाछायेच्या प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पाऊस पडलेला नाही. पाच दिवसांनंतर या परिस्थितीत फरक पडण्याचा अंदाज हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :हवामानपेरणीशेतकरीशेतीपीकपाऊस