Join us

यंदाचा ऑगस्ट शतकातील सर्वाधिक कोरडा ठरण्याची भीती?

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 20, 2023 5:00 PM

भारत एका शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने वाटचाल करत असून अल निनो हवामान बदलांच्या धरतीवर  देशात ऑगस्टमध्ये ...

भारत एका शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने वाटचाल करत असून अल निनो हवामान बदलांच्या धरतीवर  देशात ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी 'राउटर्स' वृत्तसंस्थेस सांगितले.

भारताच्या तीन लाख कोटी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असणाऱ्या मान्सूनमध्ये होणारा जवळपास 70 टक्के पाऊस भारतातील शेती आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजा पूर्ण करतो.

यंदाचा ऑगस्ट 1901 नंतर सर्वात कमी पर्जन्यमानाची शक्यता असणारा महिना आहे. पावसाने यंदा चांगलीच ओढ दिली असून कमी पावसामुळे तांदळापासून सोयाबीन पर्यंतच्या उन्हाळी पेरणी केलेल्या पिकांचे उत्पन्न कमी होऊ शकते. सध्या अन्नधान्याची महागाई आणि वाढत्या किमती जुलै 2020 नंतर सर्वोच्च पातळीवर गेली आहे.

केरळच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले की देशभरातील शेतकरी साधारणतः 1 जून पासून भात, मका, कापूस, सोयाबीन, ऊस, आणि शेंगदाणे या पिकांची लागवड करण्यास सुरुवात करतात. सध्या या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. आता पावसाच्या विलंबाने या पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारतात ऑगस्ट च्या पहिल्या 17 दिवसांमध्ये फक्त 90.7 मिलिमीटर म्हणजेच 3.6 इंच पाऊस पडला. जो जवळपास 40 टक्क्यांनी कमी आहे. यंदा ऑगस्टमध्ये पावसाची 8 टक्क्यांपर्यंत तूट असेल असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच बांधला होता. 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी म्हणजेच 191.2 मिलिमीटर म्हणजेच 7.5 इंच इतका पाऊस झाला होता. जून महिन्यात सरासरीपेक्षा दहा टक्के कमी पाऊस झाला असून जुलैच्या पावसाने सरासरीच्या १३ टक्केच परतावा दिला आहे. भारतातील सिंचनासाठी निम्म्याहून अधिक शेतजमिनीला हा पाऊस महत्त्वाचा आहे.

पुढील दोन आठवड्यांमध्ये ईशान्य आणि मध्य भागांमध्ये पाऊस सुधारण्याची अपेक्षा असली तरी वायव्य आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात 197.8 मिलिमीटर म्हणजेच 83.3% पाऊस झाला होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पाऊस सर्वसाधारण असल्याचे वसंतराव नाईक कृषी विज्ञान केंद्रातील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

"औरंगाबाद विभागात आठवड्यातील पाऊस सर्वसाधारण असेल. या आठवड्यात चांगला पाऊस झाला तर पिके वाचतील. आता पिके फुलं लागण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्याला फायदा होईल." शिवा काजळे, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद 

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेतकरीशेती क्षेत्रपीकमराठवाडाऔरंगाबादपाणी