Join us

अखेर मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले जायकवाडीकडे विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 1:35 PM

मुळा धरणाच्या ११ दरवाजांतून सोमवारी दुपारी ३ वाजता २ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

मुळा धरणाच्या ११ दरवाजांतून सोमवारी दुपारी ३ वाजता २ हजार क्युसेकने पाणीनदीपात्रात सोडण्यात आले. पाणी सोडण्याच्या काही काळ आधी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा म्हणून तीन वेळा धरणावर बसविण्यात आलेला भोंगा वाजवून सावध करण्यात आले.

कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले. २२ हजार ८३३ दशलक्ष घनफूट (८७ टक्के) पाणीसाठा कायम ठेवून उर्वरित येणारे पाणी जायकवाडीच्या दिशेने नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

२६ हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या पाणी मुळा धरणामध्ये २२ हजार ८३३ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा स्थिर आहे. धरणाकडे कोतूळ येथून १ हजार ७५३ क्युसेकने आवक सुरू आहे.

मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार १ ते १५ ऑगस्ट दरम्यान २२ हजार ८१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल. या हंगामात नदीपात्रात प्रथमच पाणी सोडले आहे. मुळा धरणात सध्या २२ हजार ८३३ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे. 

यावेळी उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे, स्थापत्य सहायक सलीम शेख, सुनील हरिश्चंद्रे, आयुब शेख, दिलीप कुलकर्णी, वैशाली साबळे, प्रिया कचरे, मुज्जफर देशमुख आदी उपस्थित होते.

१५ ऑगस्टपूर्वी पाणी सोडणार असल्याचे संकेत प्राप्त होते. अखेर धरण परिचालन सूचीनुसार साठा २२ हजार ८०० दशलक्ष घनफूटवर पोहोचल्याने पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. - सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे, अहमदनगर

टॅग्स :जायकवाडी धरणधरणपाणीपाऊसनदी