उजनी उपसा सिंचनयोजनेचा टप्पा क्र. १ तातडीने सुरू करून त्यातून या भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने ही योजना कार्यान्वित केली असून, गोदावरी उजव्या कालव्यातून पाणी उचलून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव भरण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी दिली.
धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर या गावांना गोदावरी उजव्या कालव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजीपी) योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून सदर योजना नादुरुस्त असल्यामुळे धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर या गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यावर विवेक कोल्हे यांनी गेल्या २८ नोव्हेंबर रोजी या गावातील ग्रामस्थांसह तहसीलदार संदीपकुमार भोसले व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना निवेदन देऊन उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र. १ तातडीने सुरू करून पाझर तलाव भरून द्यावेत, अशी होती. मागणी केली.
त्यानंतर गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी लगेचच उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र. १ चालू करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी केली होती. अखेर शनिवारी (१६ डिसेंबर) उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्र. १ सुरू करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे, रावसाहेब (बंडू) थोरात, महेश थोरात, बाबासाहेब थोरात, बाबासाहेब नेहे, वीरेंद्र वर्षे, सुनील थोरात, ज्ञानदेव थोरात, वाल्मीक नेहे, त्र्यंबक वर्षे, बाळासाहेब काकडे, गोरख दरेकर, प्रकाश गोर्डे आदी उपस्थित होते.