Join us

खडकवासलातून रब्बी हंगामासाठी साडेपाच टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 1:21 PM

जिल्ह्याच्या तीन तालुक्यांकरिता खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्ह्याच्या तीन तालुक्यांकरिता खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे. सुमारे साडेपाच टीएमसी पाणी यासाठी देण्यात येणार आहे. मात्र, धरणातील पाण्याची उपलब्धता बघता उन्हाळी हंगामासाठी आवर्तन देता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. रब्बी हंगामासाठी दौंड, इंदापूर, हवेली या भागातून पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे आली होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आल्याचे खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले.

त्यानुसार सोमवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून कालव्यातून सुमारे ७०० क्युसेकने पाणी ग्रामीण भागात दिले जाणार आहे. येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे साडेपाच टीएमसी पाणी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातही रब्बीसाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही आमदारांनी ही मागणी केली होती. यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याची परिस्थिती नसल्याचे जलसंपदाविभागाचे म्हणणे आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला- चारही धरणातील पाणी साठ्याचे व्यवस्थापन यंदा महत्त्वाचे ठरणार असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चारही धरणांमध्ये मिळून सध्या १.५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी याच वेळी चार धरणांमध्ये २७.२२ टीएमसी (९३ टक्के) जलसाठा होता. पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला जलसंपदा विभागाने यापूर्वीच दिला आहे.- पिकांसाठी पाणी सोडल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळा येणार नाही, परंतु महापालिका प्रशासनाला पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजित पवार यांनी महापालिका, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाला पाणी व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.

टीएमसीमध्ये पाणीसाठाटेमघर २.११ (५६ टक्के) वरसगाव ११.७ (९१ टक्के) पानशेत १०.२ (९५ टक्के) खडकवासला १.५ (७५ टक्के) भामा आसखेड ६.६७ (८७ टक्के) एकूण २५.६ टीएमसी (८७ टक्के) गेल्या वर्षीचा साठा २७.२ टीएमसी (९३ टक्के)

टॅग्स :धरणरब्बीशेतकरीपीकपाणीशेती