सांगली जिल्ह्यात शनिवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला. कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग कायम आहे. पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा नदीच्या पातळीत किंचित वाढ झाली. मात्र, वारणा, कृष्णा नदीकाठी पुराची टांगती तलवार कायम आहे. पूरस्थितीमुळे सांगली शहरासह चार तालुक्यांतील पाच हजार १३० नागरिक स्थलांतरितच आहेत.
कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. कोयनेत चोवीस तासांत ७८ मिलीमीटर पाऊस झाला असून, धरणात ८६.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून ५२ हजार १०० क्युसेकचा विसर्ग सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. चांदोलीमध्ये ६६ मिमी पाऊस झाला.
वारणा धरणातून ११ हजार ५९५ क्युसेक विसर्ग सुरूच आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात तीन इंचाने वाढली. सांगलीत आयर्विन पुलाची पाणीपातळी सायंकाळी ४० फूट होती. मात्र, कृष्णा काठावर पुराचा धोका कायम असल्याचे चित्र आहे.
वारणा नदीच्या पाणीपातळीत शनिवारी दिवसभरात एक फुटाने कमी झाली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी नदीकाठावरील शेती अद्यापही पाण्याखाली आहे.
जिल्ह्यात सरासरी ६.३ मिमी पाऊस
जिल्ह्यात शुक्रवारी सरासरी ६.३ मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक २३.७ मिमी पावसाची नोंद आहे. जिल्ह्यात पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून पडलेल्या पावसाची आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ५.८ (४५२.७), जत ९.२ (२७५.५), खानापूर ३.६ (३६५.८), वाळवा ९ (७३०.६), तासगाव २.८ (४४९.४), शिराळा २३.७ (११७९.७), आटपाडी ०.२ (२५८.९), कवठेमहांकाळ २.६ (३८९.५), पलूस ४.९ (५०७.६), कडेगाव ६.७ (४९३.९).
कृष्णा नदीची पातळी
ठिकाण | फूट इंच |
कृष्णा पूल कराड | २७.०१ |
बहे पूल | १२.१० |
ताकारी पूल | ४३.१० |
भिलवडी पूल | ४३.०९ |
आयर्विन | ३९.११ |
राजापूर बंधारा | ५२.९ |
अलमट्टीच्या विसर्गात कपात
अलमट्टी धरणातून शुक्रवारी तीन लाख क्युसेकने विसर्ग सुरु होता. यामध्ये ५० हजारांनी कपात करून शनिवारी सायंकाळनंतर दोन लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. यासंबंधीची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा - पिकांच्या नुकसानीपोटी मदतीचा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार ५९६ कोटी रुपये