रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे पंप येत्या १७ नोव्हेंबर रोजी सुरू होतील, तर टेंभू योजनेचे पंप येत्या १५ डिसेंबर रोजी सुरू होतील. त्यानंतर टेंभूचे पाणी १५ जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्रात पोहोचणार असून, या दोन्ही योजनेच्या पाण्यामधून रब्बी हंगामाचे आवर्तन यशस्वी केले जाईल, असे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू उपसा सिंचन या योजनांची कालवा सल्लागार समितीची बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी खासदार संजय पाटील, आमदार शहाजीबापू पाटील आमदार अनिल बाबर, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 'टेल टू हेड' पाणी मिळण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी केली. त्याचबरोबर आवर्तन सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याने लाभक्षेत्रात उपस्थित राहावे, अशी मागणी केली. यावर कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.