उष्णतेच्या लाटांसह दुष्काळ, पूर यासह कमालीच्या तापमानवाढीमुळे शेती आणि अन्न उत्पादनासह अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांवर परिणाम होत आहे. वाढती तापमानवाढ जगभरात चिंतेचा विषय ठरत असताना बिघडत्या हवामानामुळे भविष्यात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतील अंदाज नुकताच एका अहवालात लावण्यात आला आहे.
जर्मनीतील हवामान बदलावर संशोधन करणाऱ्या पॉट्सडॅम संस्थेचा जागतीक तापमानवाढीचा अन्नधान्याच्या किमतींवर होणाऱ्या प्रभावावर लक्ष केंद्रित करणारा एक नवा अभ्यास समोर आला आहे. या अभ्यास कम्यूनिकेशन अर्थ ॲंड एन्वायर्नमेंटमध्येही प्रकाशित झाला होता.
जगभरातील १२१ वेगवेगळ्या देशांमध्ये अन्नाच्या किमतींवर तापमानवाढीचा कसा परिणाम झाला याचा अभ्यास केल्यानंतर २०३५ पर्यंत जगभरातील खाद्यपदार्थांच्या किमती दरवर्षी १.४९ ते १.७९ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज यामध्ये लावण्यात आला आहे.
भविष्यातील तापमान वाढीमुळे अन्नधान्याच्या किमतींसह चलनवाढीवर त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवेल असे सांगण्यात आले आहे. या संशोधनात असेही आढळून आले आहे की २०२२ च्या उन्हाळ्यात संपूर्ण युरोपात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे तिथली अन्नधान्य महागाई ०.६७ टक्क्यांनी वाढली.
भविष्यातील तापमानवाढ आणि अन्नधान्य टंचाई यापूर्वीच गरम असणाऱ्या प्रदेशांना आणि विशेषत: गरीब व विकसनशिल देशांना अधिक जाणवेल असेही या अहवालात नोंदवण्यात आले आहे.