२०२३ हे उष्ण हवामानाचे वर्ष ठरल्यानंतर 'अल निनो'चा प्रभाव यावर्षी जूनपर्यंत समाप्त होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा दमदार पावसाच्या आशा उंचावल्या आहेत.
किमान दोन जागतिक हवामान संस्थांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले की, जगभरातील हवामानावर परिणाम करणारा अल निनो कमकुवत होऊ लागला आहे. ऑगस्टपर्यंत 'ला नीना'ची स्थिती निर्माण होऊ शकते.
या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी जून-ऑगस्टपर्यंत 'ला निना परिस्थिती निर्माण झाल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस चांगला होईल, असे म्हटले आहे. जून-जुलैपर्यंत 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले.
काय आहे अल निनो?अल निनो म्हणजे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढण्याची प्रक्रिया. 'अल-निनोच्या प्रभावामुळे देशात मान्सूनचे चक्र विस्कळीत होते. त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते.
मान्सून देतो ७०% पाऊसभारताच्या वार्षिक पावसापैकी सुमारे ७०% पाऊस हा नैऋत्य मान्सूनमधून येतो, जो कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. जीडीपीमध्ये त्याचा वाटा सुमारे १४% आहे. देशाच्या १.४ अब्ज लोक- संख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांना यातून रोजगार मिळतो.