सोलापूर शहरासह नदी काठचा गावांना पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणातून सोमवार दि. ११ रोजी पहाटे ५ वाजता १ हजार ५०० क्युसेक विसर्गाने भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापक अभियंता प्रशांत माने यांनी दिली.
सोलापूर महानगर पालिकेने २० मार्च पर्यंत टाकळी व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार दि. ११ रोजी पहाटे ५ वाजलेपासून उजनी धरणातून १ हजार ५०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे.
दर चार तासांनी वाढ करून एकूण ५ हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात येणार असल्याचे अभियंता प्रशांत माने यांनी दिली. हे पाणी दि. २१ मार्चपर्यंत सोडण्यात येणार असून एकूण अंदाजे ५ टीएमसी पाणी या पाळीत पाणी सोडण्यात येणार आहे.
सोलापूर शहरासह, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा व नदी काठच्या गावांना व शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार असून पुढील दोन महिने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. उजनी धरण ते टाकळी व चिंचपूर बंधारा हे २३२ किलोमीटर अंतर असून पाणी पोहचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.
तसेच भीमा नदी वरील १७ बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. सध्या उजनी धरण वजा १८.४२ टक्के पाणी पातळी झाली असून एकूण ५३. ७९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
गतवर्षी १० मार्च २३ रोजी उजनी धरणात ९७. २६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता तर ६२.७३ टक्के पाणी पातळी शिल्लक होती.