Join us

आनंदाची बातमी, कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 11:28 AM

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ महाबळेश्वरला सर्वाधिक तासात ६२ मिलिमीटरची नोंद झाली.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून, गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ महाबळेश्वरला सर्वाधिक तासात ६२ मिलिमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने कोयना साठ्यानेही ९१ टीएमसीच्या दिशेने झेप घेतली आहे. तरीही धरण भरण्यासाठी अजून १४ टीएमसी पाण्याची गरज असल्याने भरणार का, याबाबत चिंता कायम आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे २५ मिलिमीटर पाऊस झाला. एक जूनपासूनचा विचार करता कोयनेला ३८३३ तर नवजा येथे ५५०६ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने यंदा कोयना भरले नसले तरी सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर धरणात सध्या ९१ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. सप्टेंबर महिना संपत आला तरी वार्षिक सरासरीच्या ६० टक्केही पर्जनम्यान झालेले नाही. त्यामुळे पश्चिम भागातील कोयनेसह उरमोडी, कण्हेर ही मोठी धरणे भरलेली नाहीत. तर बलकवडी आणि तारळी धरणांत तेवढा चांगला पाणीसाठा आहे. तर पूर्व भागातील पाझर तलाव कोरडे पडलेले आहेत. अशातच अजूनही दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत चालली आहे. यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातून गुरुवारपासून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून त्यातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सांगलीसाठी करण्यात येत आहे.

टॅग्स :कोयना धरणधरणसातारापाणीसांगलीपाऊस